Grape Farmers : जालना जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या ऑक्टोबर महिन्यातील छाटणी आणि पेस्टिंगच्या कामात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बागांची वाढ खुंटली असली तरी आता हवामान अनुकूल झाल्याने शेतकरी पुन्हा उत्साहात कामाला लागले आहेत. (Grape Farmers)
या कामांसाठी परजिल्ह्यातून तब्बल ४०० ते ५०० मजूर जालना तालुक्यात दाखल झाले आहेत.(Grape Farmers)
द्राक्ष बागांमध्ये पुन्हा हालचाल
तालुक्यात सध्या जवळपास १ हजार ६५ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांची लागवड झाली आहे. या क्षेत्रावर १ हजार ८४७ शेतकरी द्राक्ष शेती करतात.
द्राक्ष छाटणी आणि पेस्टिंग ही कामे अत्यंत कुशलतेने करावी लागतात, म्हणूनच परभणी, बीड, औरंगाबाद आणि नांदेडसारख्या जिल्ह्यांतून मजुरांचा ओघ सुरू झाला आहे.
कडवंची, नंदापूर, वरूड या भागात छाटणीचे काम जोमाने सुरू असून, मजुरांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम मिळत आहे.
खर्च वाढला, मदतीची अपेक्षा कायम
एका एकरवरील द्राक्ष बागेच्या देखभालीसाठी एक लाख रुपयांहून अधिक खर्च येतो. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांना खर्चही परत मिळत नाही. विमा योजनांचा लाभ अनेकांना मिळालेला नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी मागणी होत आहे.
छाटणी उशिराने झाल्याने द्राक्षे एकाचवेळी विक्रीला येतील, त्यामुळे पुढे दर घसरतील की काय, अशी भीती आहे. - दत्तू कुरधने, सरपंच, नंदापूर
अतिवृष्टीचा दुष्परिणाम
या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे बागांतील पिके ओलाव्यामुळे नुकसानग्रस्त झाली. त्यामुळे नेहमीप्रमाणे सप्टेंबरमध्ये होणारी छाटणी पुढे ढकलावी लागली. आता बागा फुटतात की नाही, हीच चिंता आहे. - जनार्धन जारे, शेतकरी, कडवंची
कृषी विभागाचे मार्गदर्शन
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना छाटणी, पेस्टिंग आणि रोगनियंत्रण याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. वाघरूळ, वरूड, नाव्हा, गोलापांगरी, धारकल्याण, नंदापूर, दुधना, काळेगाव परिसर, नेर आणि सेवली या गावांत मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड आहे. - विष्णू राठोड, तालुका कृषी अधिकारी, जालना
हंगाम बहरला
आता हवामान अनुकूल राहिल्यास आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळला गेला, तर यावर्षीचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी लाभदायक ठरू शकतो, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, खर्च, दर आणि विमा यांसारख्या मूलभूत समस्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.