Join us

Gram Panchayat : तुमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्याला किती रुपये मानधन मिळतं? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:25 IST

Gram Panchayat : या प्रत्येकाला गावात मोठा मान असतो. पण सगळ्यांना पगार मिळतो का? तो किती असतो. हे आज पाहुयात... 

Gram Panchayat :   गावचा गाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायत काम करीत असते. यामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य अशी कार्यकारिणी निवडली जाते. या प्रत्येकाला गावात मोठा मान असतो. पण सगळ्यांना पगार मिळतो का? तो किती असतो. हे आज पाहुयात... 

महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य आणि सरपंच यांना महिन्याकाठी मानधन दिले जाते. काहींना बऱ्यापैकी पैसे मिळतात तर काहींना अगदी तुटपुंजी रक्कम मिळते. लोकसेवक म्हणून त्यांना मानधन दिले जाते. विशेष त्या गावातील लोकसंख्येवर मानधन दिले जाते. 

आता गावाची लोकसंख्या २ हजार असेल तर अशा गावातील सरपंचाला तीन हजार रुपये मानधन, तर उपसरपंचाला एक हजार रुपये मानधन मिळते. लोकसंख्या दोन ते आठ हजारांच्या दरम्यान असल्यास सरपंचाला चार हजार रुपये, उपसरपंचाला दीड हजार रुपये मानधन मिळते. तर ग्रामपंचायत सदस्यांना महिन्याला फक्त २०० रुपये मानधन मिळते. 

तर आठ हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचाला पाच हजार रुपये मानधन व उपसरपंचास दोन हजार रुपये मानधन मिळते. ग्रामपंचायत सदस्याला मासिक बैठकीचा केवळ २०० रुपये सदस्य भत्ता मिळतो. म्हणजेच २०० रुपयांवर सदस्यांची बोळवण केली जाते. 

राज्य सरकारने सरपंच-उपसरपंच या पदाचे मानधन वाढविले, या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, ग्रामपंचायत सदस्यांना फक्त २०० रुपये मानधन देणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. सरकारने वाढीव मानधन देण्यात उशीर करू नये, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे.- चंद्रकुमार बहेकार, जिल्हाध्यक्ष-सरपंच संघटना, गोंदिया.

टॅग्स :ग्राम पंचायतशेती क्षेत्रशेतीशेतकरी