Join us

Fertilizers and Seeds Update : खते-बियाण्यांवरून शेतकऱ्यांची फरफट; बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:06 IST

Fertilizers and Seeds Update : नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाने घेतलेले ३३८ नमुने तपासणीसाठी पाठवले, त्यात तीन नमुने अप्रामाणित आढळले. परजिल्ह्यांतील बोगस खते-बियाण्यांच्या आड शहरातील काही मोठ्या व्यापाऱ्यांचे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Fertilizers and Seeds Update)

Fertilizers and Seeds Update : कृषी विभागाने नांदेड जिल्हाभरातून ३३८ खत-बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यामध्ये ३ नमुने अप्रमाणित आढळून आले असून, त्यात एक सोयाबीन बियाण्याचा आणि दोन खतांचे नमुने आहेत. (Fertilizers and Seeds Update)  

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत आणि बियाण्यांच्या वितरणात मोठा गैरप्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील खत आणि बियाणे विक्रीच्या काळ्या बाजारात शहरातील काही बड्या व्यापाऱ्यांचे हात असल्याचा संशय व्यक्त होत असून, कृषी विभागाच्या तपासात हे प्रकार उघडकीस येत आहेत.(Fertilizers and Seeds Update)  

सीमावर्ती व्यापाऱ्यांचा काळा धंदा?

नांदेड हा तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकाच्या सीमेलगतचा जिल्हा असल्यामुळे, बाहेरून बोगस बियाणे आणि खते जिल्ह्यात आणण्याचा प्रकार वाढला आहे. 

विशेषतः नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरातील काही व्हाईट कॉलर व्यापारी परराज्यातून अप्रमाणित बियाणे व खते शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेच्या नावाखाली विकत असल्याचा आरोप आहे.

गुजरातहून आलेल्या काही कंपन्यांचे बोगस कपाशी बियाणे 'हायब्रिड' किंवा 'उत्तम उगम क्षमतेचे' असल्याचे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.

जाणीवपूर्वक तुटवड्याचं नाटक?

शेतकऱ्यांच्या गरजांनुसार पुरवठा करण्या ऐवजी काही व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक खत आणि बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना बाजारात अनधिकृत व अप्रमाणित माल खरेदी करण्याची वेळ येते.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बियाणे व खत विक्रेत्यांना दुकानाच्या दर्शनी भागात साठ्याची माहिती फलकावर लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही विक्रेत्यांकडून हे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत.

नमुना तपासणी आणि अहवालाची वाट

सद्यस्थितीत जिल्हा परिषदेने ११३, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने १२५ बियाण्यांचे आणि १०० खतांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 

बियाण्यांचे नमुने परभणी कृषी विद्यापीठात, तर खताचे नमुने छत्रपती संभाजीनगर प्रयोगशाळेत तपासले जात आहेत.

खते उपलब्धतेसाठी मंजूर झाले आवंटन

१ ते १५ जूनदरम्यान डीएपी आणि युरियाच्या उपलब्धतेसाठी १३ हजार ५०० मे. टन युरिया, ८ हजार ३०० मे. टन डीएपी, व १ हजार ३५० मे. टन एमओपी (MOP) खते जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत. या व्यतिरिक्त बफर स्टॉक उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा संदेश 

* पावती आणि बॅगवरील टॅग जपा

* विविध वाण वापरा : एका कंपनीवर विसंबू नका

* बिनधास्त फक्त अधिकृत खत-बियाण्यांचा वापर करा

* शंका आल्यास कृषी विभागाशी त्वरित संपर्क साधा

कृषी विभागाचा सल्ला

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी घाई केल्यास त्याचा परिणाम उगवण क्षमतेवर होऊ शकतो. त्याचबरोबर विविध वाणांचे बियाणे वापरावे, कोणी एका कंपनीचे वापरले म्हणून त्याचाच आग्रह धरू नये. त्याचप्रमाणे खतेदेखील पर्यायी वापरावेत. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. कृषी विभागाने आवाहन केलेल्या खतांचा आणि बियाणांचा शेतकऱ्यांनी बिनधास्त वापर करून योग्य वेळी पेरणी करावी. - सचिन कपाळे, मोहीम अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : सीमावर्ती भागातून बोगस बियाण्यांची घुसखोरी; नांदेडसह मराठवाड्यात काळाबाजार उघड! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीखतेनांदेड