अजिंक्य काथार
शेती म्हणजे फक्त पारंपरिक पिकेच असा समज मोडून, बोधेगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी बाबूराव बनसोड यांनी मशरूम लागवडीचा अभिनव प्रयोग करून परिसरात आदर्श निर्माण केला आहे. (Farmer Success Story)
त्यांनी घरातील फक्त २०x४० फूट जागेत मशरूम लागवड सुरू केली आणि अवघ्या ४५ दिवसांत तब्बल ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.(Farmer Success Story)
मशरूम शेतीची सुरुवात
सहा महिन्यांपूर्वी बाबूराव बनसोड यांनी पारंपरिक शेतीसोबतच वेगळ्या व्यवसायाचा विचार केला. त्यांनी मशरूम लागवडीबद्दल माहिती गोळा करून २०x४० फूट खोली तयार केली. यात रॅकवर ३०० प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये लागवड सुरू केली.
लागणारे साहित्य
गव्हाचा पेंढा किंवा भाताचा पेंढा
सोयाबीनचा भुसा, कडबा
प्लास्टिक कॅरीबॅग (५ किलो क्षमतेच्या)
मशरूम बिया (१२० रुपये प्रति किलो)
सुई व धागा
गव्हाचा पेंढा, भुसा यांसारखा कच्चा माल शेतातच उपलब्ध असल्याने खर्चात बचत होते आणि शेतातील कचऱ्याचा योग्य वापर होतो.
उत्पन्न व खर्च
खर्च: अंदाजे १ लाख रुपये
एकूण उत्पन्न: ३ लाख रुपये
निव्वळ नफा: २ लाख रुपये (४५ दिवसांत)
मशरूमची विक्री गुणवत्तेनुसार ५०० ते ७०० रु. प्रति किलो दराने झाली. वाढलेल्या मागणीमुळे विक्रीला कोणतीही अडचण आली नाही.
मशरूम शेतीचे फायदे
कमी जागेत मोठ्या प्रमाणात उत्पादन
हंगामाची अडचण नाही त्यामुळे वर्षभर उत्पादन घेता येते
आरोग्यासाठी उत्तम : प्रथिने, व्हिटॅमिन डी यांचा समृद्ध स्रोत
औषधनिर्मितीतही वापर
भावी योजना
बाबूराव बनसोड आता मशरूम शेतीचा व्यवसायिक स्तरावर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी गावातील युवकांनाही मशरूम शेती शिकवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
बोधेगावच्या बाबूराव बनसोड यांची मशरूम शेती ही कमी जागेतून जास्त नफा मिळवण्याचा उत्तम आदर्श आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत, नवीन तंत्रज्ञान स्वीकारले तर शेतकरीही लाखो रुपये कमावू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
मी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, मशरूम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. कमी जागा, कमी वेळ आणि कमी खर्च तरीही जास्त नफा मिळू शकतो, हे या व्यवसायाने सिद्ध केले. - बाबूराव बनसोड, शेतकरी