चंद्रपूर : अवघ्या एक लाख रुपयांच्या कर्जापोटी सावकारांना तब्बल ७४ लाख रुपयांची परतफेड करावी लागली. कर्जाच्या अमानुष तगाद्यामुळे शेती, वाहने विकल्यानंतर अखेर शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. अवैध सावकारांच्या क्रूर छळाचा हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात उघडकीस आला आहे.
रोशन शिवदास कुळे असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोशन कुळे या पीडित शेतकऱ्याने दुग्धव्यवसायासाठी १५ ते २० गायी खरेदी केल्या. मात्र लम्पी आजाराने काही जनावरे दगावल्याने व्यवसाय तोट्यात गेला. अडचणीत सापडलेल्या रोशनने ब्रह्मपुरीतील काही अवैध सावकारांकडून एक लाख रुपये कर्ज घेतले.
मात्र चार ते पाच जणांच्या टोळीने अवाढव्य व्याज आकारत दमदाटी सुरू केली. कर्ज फेडण्यासाठी रोशनने दुचाकी, ट्रॅक्टर, साडेतीन एकर शेतीही विकली; मात्र व्याजाचा डोंगर वाढतच राहिला व अखेर त्याला आपली किडनी विकावी लागली. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
पैशांसाठी सावकारांकडून छळ; शेतकऱ्याला डांबून मारहाणरोशन कुळे या शेतकऱ्याचा सावकारांनी पैशांसाठी छळ केल्याचे पुढे आले आहे. त्यांना डांबून मारहाणही झालेली आहे. सावकारांच्या पैशांच्या तगाद्यामुळेच ऑक्टोबर २०२४ मध्ये आपण कंबोडियात किडनी विकल्याचे पीडित सांगत आहे. याचा नेमका तपास करण्यात येत आहे. पीडिताने सावकारांना दिलेल्या रकमेच्या नोंदींवरून सावकारांमुळेच किडनी विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासात सगळे निष्पन्न होईल.- मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर
यू-ट्यूब सर्च करून गाठले कंबोडियासावकारांचा पैशांसाठी तगादा सुरू असल्यामुळे किडनी विकून पैसे परतफेड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी यू-ट्यूब सर्च करून आपण कंबोडिया या देशात गेलो. तत्पूर्वी कोलकाता येथे आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. यानंतर कंबोडिया देशात आठ लाख रुपयांना किडनी विकली आणि तेही सावकारांनी बळकावल्याचे शेतकरी रोशन कुळे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अवयव खरेदीदार आणि विक्रेते अशा व्यवहारांसाठी ठिकाणे कशी शोधतात, हे विचार करायला लावणारे आहे. अशा प्रकारचा घृणास्पद व्यापार केवळ निंदनीयच नाही, तर तो दाते आणि प्राप्तकर्ते दोघांच्याही जिवाला धोका निर्माण करू शकतो. प्रत्येक नागरिकाने अशा व्यापाराची माहिती मिळताच तत्काळ तक्रार करावी, जेणेकरून शोषण आणि मानव तस्करीला सुरुवातीच्या टप्प्यातच आळा घालता येईल.- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटर, नागपूर
Web Summary : Burdened by debt, a Chandrapur farmer sold his kidney after lenders demanded exorbitant repayments. He initially borrowed ₹1 lakh but was forced to pay ₹74 lakhs. Six arrests have been made in connection with the exploitative lending practices.
Web Summary : कर्ज से परेशान चंद्रपुर के एक किसान ने कर्ज चुकाने के लिए अपनी किडनी बेच दी क्योंकि कर्जदाताओं ने भारी भरकम रकम की मांग की थी। उसने शुरू में ₹1 लाख उधार लिए थे लेकिन उसे ₹74 लाख चुकाने के लिए मजबूर किया गया। शोषणकारी ऋण देने की प्रथाओं के संबंध में छह गिरफ्तारियां की गई हैं।