Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farm Dispute Resolved :'खाकी'ची कमाल; शेतात जाऊन पोलिसांनी घडवला समझोता वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 20:22 IST

Farm Dispute Resolved : ७ वर्षांपासून सुरू असलेला शेतीचा वाद… ६ तक्रारी… आणि सततचा तणाव! पण लातूर पोलिसांनी कोर्टाचा मार्ग न धरता थेट शेताच्या बांधावर जाऊन हा वाद मिटवला. 'पोलिस शेतकऱ्यांच्या बांधावर' या उपक्रमामुळे आता गावातच प्रश्न सुटू लागले असून, या अनोख्या मोहिमेची सर्वत्र चर्चा होत आहे. (Farm Dispute Resolved)

Farm Dispute Resolved : ग्रामीण भागातील शेतीसंबंधित वाद न्यायालयात न नेता गावातच सामोपचाराने मिटवण्यासाठी लातूर पोलिसांनी सुरू केलेली 'पोलिस शेतकऱ्यांच्या बांधावर' ही अभिनव मोहीम यशस्वी ठरत आहे. (Farm Dispute Resolved)

या उपक्रमांतर्गत रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथे तब्बल सात वर्षांपासून सुरू असलेला जमीन वाद पोलिसांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन मिटवला.(Farm Dispute Resolved)

७ वर्षांचा वाद; सहा तक्रारी, पाच गुन्हे

घनसरगाव येथील विलास शिवाजी आमनावर आणि परमेश्वर आमनावर यांच्यात शेतीच्या बांधावरून गेल्या सात वर्षांपासून वाद सुरू होता. 

या वादामुळे दोन्ही गटांमध्ये सतत तणावाचे वातावरण होते. प्रकरण इतके चिघळले होते की, दोन्ही बाजूंनी रेणापूर पोलिस ठाण्यात एकूण सहा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, तर पाच अदखलपात्र गुन्ह्यांची नोंदही झाली होती.

पोलिसांची थेट शेतात एन्ट्री; सामोपचाराचा मार्ग

लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणात पुढाकार घेतला. रेणापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देडे आणि त्यांच्या पथकाने थेट वादग्रस्त शेतजमिनीवर जाऊन दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून घेतली.

पोलिसांनी केवळ कायद्याचा धाक न दाखवता, दोन्ही कुटुंबांना सामाजिक परिणाम आणि कायदेशीर गुंतागुंत यांची जाणीव करून दिली. तसेच स्थानिक पोलिस पाटील आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करत समन्वय साधला.

अखेर तोडगा; भविष्यात सलोख्याचे आश्वासन

पोलिसांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही पक्षांनी जुना वाद मिटवण्यास सहमती दर्शवली. भविष्यात गुण्यागोविंदाने राहण्याचे लेखी व तोंडी आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे गावातील तणावपूर्ण वातावरण निवळले असून सामाजिक सलोखा पुन्हा प्रस्थापित झाला आहे.

'पोलिस शेतकऱ्यांच्या बांधावर' उपक्रमाला प्रतिसाद

लातूर जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचत आहे. न्यायालये आणि पोलिस ठाण्यांच्या फेऱ्यांपासून दिलासा मिळत असून, स्थानिक पातळीवरच वाद मिटवले जात आहेत. नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वासही वाढत असल्याचे चित्र आहे.

देवणी तालुक्यातही अभियान सुरू

देवणी तालुक्यातही ‘पोलिस शेतकऱ्यांच्या बांधावर’ हे अभियान राबवले जात आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या नेतृत्वात १६ ते ३० मार्च दरम्यान ६४ गावांमध्ये हे अभियान सुरू आहे.

दररोज ठराविक गावांमध्ये पोलिस पथक थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शेतीसंबंधित वाद, बांधावरून होणारे भांडण आणि इतर सामाजिक प्रश्न ऐकून घेऊन ते सामोपचाराने सोडवण्यावर भर दिला जात आहे.

तज्ज्ञांचा सल्ला

किरकोळ वादांसाठी न्यायालयात जाण्यापेक्षा पोलिसांच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा. यामुळे वेळ, पैसा वाचतो आणि सामाजिक सलोखा टिकून राहतो, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. अमोल तांबे यांनी केले आहे.

लातूर पोलिसांची ‘खाकी’ आता केवळ कायद्याची अंमलबजावणी न करता समाजात समन्वय आणि सलोखा निर्माण करण्याचे काम करताना दिसत आहे.

‘पोलिस शेतकऱ्यांच्या बांधावर’ हा उपक्रम ग्रामीण भागात वाद मिटवण्यासाठी प्रभावी ठरत असून, इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरू शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Kanda Bajarbhav : रामनवमीला कांद्याला चांगला भाव की घसरण? बाजारात मोठे चढ-उतार!

अधिक वाचा :सावकारांचा सापळा घट्ट; २.३४ लाख शेतकरी कर्जात बुडाले वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Police Resolve 7-Year Farm Dispute on the Field

Web Summary : Latur police's initiative resolved a seven-year farm dispute in Renapur. The 'Police at Farmers' Fields' program fostered understanding, averting court involvement. Six complaints and five non-cognizable offenses were resolved through mediation, restoring harmony and saving time and money for farmers.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती