Fake Seeds : धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांचे बियाणे वापरूनही दुबार पेरणीचा फटका बसला आहे. सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांमुळे उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Fake Seeds)
कृषी विभागाकडे १० जुलैपर्यंत १५८ शेतकऱ्यांच्या तक्रारी धडकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १२१ तक्रारी महाबीज या सरकारी कंपनीच्या बियाणांबाबत आहेत तर उर्वरित ३७ तक्रारी अन्य खासगी कंपन्यांविरोधात आहेत. (Fake Seeds)
खरीप पेरणी करताना बहुतांश शेतकरी नामांकित सरकारी कंपनीच्या महाबीज बियाणाची मागणी करतात; मात्र यंदा नामांकित सरकारी कंपनीच्या बियाणांनीच शेतकऱ्यांना दगा दिला आहे. (Fake Seeds)
पेरणी केल्यानंतर १५ ते २० दिवसांनी उगवण क्षमता अत्यंत कमी असल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागात तक्रार देण्यास सुरूवात केली. १० जुलैपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील १५८ शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत.(Fake Seeds)
तक्रारीनंतर उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी संबंधित कंपनीने बियाणे देण्याची गरज आहे; मात्र संबंधित कंपनीने बोटावर मोजण्याएवढ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे दिली. (Fake Seeds)
बहुसंख्य शेतकऱ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. कंपन्यांकडून बियाणे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संतप्त व्यक्त होत असून आता न्यायासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.(Fake Seeds)
२२ शेतकऱ्यांनाच दिले बियाणे
धाराशिव जिल्ह्यातील कमी अधिक क्षेत्रावरील हजारो शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही; मात्र यापैकी १५८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. तक्रार केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ २२ शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून मोफत बियाणे दिले आहे.
उर्वरित १३६ तक्रारदार शेतकरी व तक्रार न दिलेले शेतकरी भरपाईपासून बंचित आहेत. हजारो हेक्टरवरील बियाणांसह खत, मशागत वाया गेली आहे. दुबार पेरणीचा भुर्दंड बसला. यातील बहुतांश शेतकरी भरपाई मिळवण्यासाठी ग्राहक मंचात धाव घेणार आहेत.
बियाणांची उगवण न झाल्याने जिल्ह्यातील १५८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुबार पेरणीसाठी संबंधित कंपनीने मोफत बियाणे देणे अपेक्षित आहे. काही शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आले आहे. बियाणे व भरपाई न दिल्यास शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या आधारे ग्राहक मंचात जावे.- रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव
तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंचनामे करून मुख्यालयाला पाठवले आहेत. वरिष्ठ स्तरावरून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात येईल. २२ शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आले आहेत. इतर शेतकऱ्यांचा वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेतला जाईल.- एन. जी. इनामदार, जिल्हा व्यवस्थापक महाबीज
अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. काही शेतकऱ्यांना संबंधित कंपनीने पुन्हा बियाणे दिले आहे. ज्या कंपनीने बियाणे दिले नाही, त्या कंपनीच्या विरोधात शेतकरी ग्राहक मंचात दाद मागणार आहेत.- विलास नाईकनवरे, लासोना, शेतकरी