Fake Seeds : नांदेड जिल्ह्यात यंदा सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला मोठा चटका बसला आहे. बड्या व्यापाऱ्यांनी आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशसह बाहेरील राज्यांतून बोगस बियाणे मागवून शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. (Fake Seeds)
विशेष म्हणजे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या गोरखधंद्याकडे कानाडोळा केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. हजारोंच्या संख्येने तक्रारी दाखल होऊनही कारवाई मात्र नाममात्र असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत चालला आहे.(Fake Seeds)
सोयाबीन-कपाशी पिकांना फटका
यंदा जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली असून कपाशीची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. वाढलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून कोट्यवधी रुपयांचे बियाणे खरेदी केले.
कृषी विद्यापीठाने घरेलू बियाणे वापरा असा सल्ला देऊनही, 'चांगल्या वाणाचा' हव्यास धरलेल्या शेतकऱ्यांनी बाजारातून बोगस बियाणे घेतले.
सुरुवातीला पावसामुळे उगवण झाली नाही असे वाटले, मात्र पाऊस मुबलक झाल्यानंतरही बियाणे उगवली नाहीत. काही शेतकऱ्यांच्या शेतात उगवण झाली तरी ती अतिशय तुरळक आणि निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुबार पेरणीचा खर्च करावा लागत आहे.
हजारो तक्रारी दाखल… तरी कारवाई नाही!
तालुका व जिल्हा कृषी कार्यालयात हजारोंच्या संख्येने ऑनलाइन व लेखी तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र, अधिकारी मात्र आकडेवारी गोळा करत आहोत, तपास सुरू आहे, असे ठरलेले उत्तर देत आहेत.
तालुकानिहाय प्राप्त झालेल्या तक्रारी
हिमायतनगर : २२
कंधार : ३२
बिलोली : १८
मुखेड : १३
माहूर : ६
उमरी : ३
भोकर : २
प्रत्यक्षात या संख्येपेक्षा शेकडोंनी अधिक तक्रारी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी अद्याप एकत्रित अहवाल जाहीर केलेला नाही. यामुळेच अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय बळावत आहे.
बोगस बियाण्यांच्या रॅकेटला नांदेडचेच खतपाणी?
शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, आंध्रप्रदेश व गुजरात येथून आलेल्या बोगस कपाशी व सोयाबीन बियाण्यांचे रॅकेट नांदेडमधूनच चालवले जाते. बाहेरील दलाल, स्थानिक व्यापारी व कृषी अधिकाऱ्यांचे आर्थिक व्यवहार यामागे असल्याचा संशय आहे.
नवीन मोंढ्यातील एका नामांकित दुकानातून घेतलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली तरीही दुकानावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
शेतकऱ्यांचा संताप
वेळही गेला, पैसाही गेला मानसिक त्रास मात्र अजूनही चालू आहे. कारवाई झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल.- आनंद शिंदे, शेतकरी
शेतकऱ्यांची मागणी
* दोषींवर कठोर कारवाई करा
* दोषी दुकानांचे परवाने रद्द करा
* नुकसानग्रस्तांना भरपाई द्या
* कारवाई अहवाल तत्काळ जाहीर करा