Fake Fertilizers : खरीप हंगाम सुरू असताना, खते व बियाण्यांच्या टंचाईचा फायदा घेणाऱ्यांवर जिल्हा कृषी विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या १० कृषी सेवा केंद्रांना निलंबित करण्यात आले असून, आणखी केंद्रे रडारवर आहेत. (Fake Fertilizers)
ऐन हंगामात शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे आणि किटकनाशकांची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेत जालना जिल्ह्यातील १० कृषी सेवा केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यात वरद, विघ्नहर्ता, मोरया यांसारख्या नावाजलेल्या केंद्रांचाही समावेश आहे. (Fake Fertilizers)
नियमभंग करणाऱ्या केंद्रांवर कारवाई
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांच्या निर्देशानुसार, जालना जिल्ह्यातील ३५ कृषी सेवा केंद्रांवर तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यातील १० केंद्रांवर अंतिमतः निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
'या' कृषी केंद्रांवर झाली निलंबनाची कारवाई
तीर्थपुरी (जि. जालना) वरद कृषी सेवा केंद्र, विघ्नहर्ता अॅग्रो ट्रेडर्स, मोरया कृषी सेवा केंद्र, श्रीराम कृषी सेवा केंद्र, वरद कृषी सेवा केंद्र अॅण्ड मशिनरी, साई इंटरप्रायजेस
इतर ठिकाणी
धनश्री कृषी सेवा केंद्र (घनसावंगी), कालिका कृषी सेवा केंद्र (रांजणी), मनीषा कृषी सेवा केंद्र (रांजणी), माऊली कृषी केंद्र (माहोरा)
'या' त्रुटी ठरल्या कारवाईस कारणीभूत
दर फलक न लावणे
साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे
विक्री बिले न ठेवणे
POS मशीनवर विक्री न करणे
स्टॉकमध्ये अनियमितता
संपत्तीचा तपासही सुरू
या कृषी केंद्रांकडे असलेल्या खते, बी-बियाणे, किटकनाशकांचा तपास कृषी विभाग करत असून, बोगस किंवा गुणवत्ताहीन सामग्री आढळल्यास गुन्हे दाखल होणार आहेत.
कृषी विभागाचा इशारा
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणांची अडचण येऊ नये, यासाठी कारवाई सुरू आहे. त्रुटी आढळल्यास यापुढेही निलंबन केले जाईल. - जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना
इतर केंद्रही रडारवर!
जालना जिल्ह्यातील इतर कृषी सेवा केंद्रांचीही तपासणी युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच नवीन नोटिसा बजावल्या जाणार आहेत. समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.