Fake Fertilizers : बुलढाणा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या अनेक नियमभंगांवर आता कृषी विभागाने धडक मोहीम आखली आहे. (Fake Fertilizers)
अलीकडील तपासणीत अनेक केंद्रांवर मुदतबाह्य कीटकनाशके, बियाणे व जादा दराने खत विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर ७२ कृषी केंद्रांचे परवाने थेट रद्द, तर ९३ परवाने निलंबित करण्यात आले. तसेच ई-पॉस प्रणालीद्वारे खत विक्री न करणाऱ्या ७० विक्रेत्यांवर रद्दीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.(Fake Fertilizers)
काय आढळलं तपासणीत?
पराग कृषी सेवा केंद्र, धाड येथे मुदतबाह्य बियाणे आणि जादा दरात खत विक्री सुरू होती.
वैभव कृषी सेवा केंद्र, रायपूर आणि साई कृषी सेवा केंद्र, पांगरी येथे नियमभंग केल्याचे अढळले.
ई-पॉस प्रणाली न वापरणारे अनेक विक्रेते
कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, अनुदानित खतांची विक्री ही केवळ ई-पॉस मशीनद्वारेच करणे आवश्यक आहे. या प्रणालीत तात्काळ नोंद करणे अपेक्षित असून दिरंगाई झाल्यास कारवाई अटळ आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेवर खत, बियाण्यांचा पुरवठा व्हावा, यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. विभागाकडून सातत्याने तपासण्या सुरू ठेवण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अन्य केंद्र चालकांनाही इशारा मिळाल्याने, बियाणे व खत विक्रीत पारदर्शकता वाढण्याची शक्यता आहे.
मुदतबाह्य कीटकनाशक, बियाण्यांची विक्री
पराग शेतकरी कृषी सेवा केंद्र, धाड येथे मुदतबाह्य कीटकनाशक व बियाणे तसेच जास्त दराने खत विक्री केल्याच्या आरोपीवर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश आप्पासाहेब सावंत यांनी केलेल्या तपासणी अहवालानुसार संबंधित केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर वैभव कृषी सेवा केंद्र, रायपूर आणि साई कृषी सेवा केंद्र, पांगरी तालुका यांचाही खत विक्रीचा परवाना निलंबित केला आहे. या कारवाईमुळे कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे.
सतत तपासण्याचा कृषी विभागाचा दावा
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या पुरवठ्याची गैरसोय होऊ नये, यासाठी विभागाकडून सतत तपासण्या करण्यात येत आहेत. कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिला आहे.