Join us

Fake Fertilizer : बियाणे-खतांचे नमुने नापास; अप्रमाणित बियाण्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना दिलासा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:33 IST

Fake Fertilizer : खरीप हंगामात शेतकऱ्यांना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने मोठी मोहीम राबवली. तपासणीत बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे तब्बल १४२ नमुने अप्रमाणित ठरले. यातील गंभीर दोष असलेल्या ९७ कंपन्यांविरोधात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोषी कंपन्यांना शिक्षेस सामोरे जावे लागणार आहे. (Fake Fertilizer)

बापू सोळुंके 

खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने मोठी कारवाई हाती घेतली आहे. विभागीय गुणनियंत्रण कक्षाने बियाणे, खते आणि कीटकनाशकांची तपासणी केली असता तब्बल १४२ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. (Fake Fertilizer)

यामध्ये बियाण्यांचे १०३ नमुने, खतांचे ३५ नमुने आणि कीटकनाशकांचे ४ नमुने आहेत. यापैकी गंभीर दोष आढळलेल्या ९७ कंपन्यांविरोधात कोर्टात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.(Fake Fertilizer)

बियाण्यांमध्ये सर्वाधिक दोष

कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि तूर या खरीप हंगामातील बियाण्यांचे शेकडो नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५२ नमुने, जालना जिल्ह्यातील ३० नमुने तर बीड जिल्ह्यातील २१ नमुने असे एकूण १०३ नमुने अप्रमाणित ठरले.

यापैकी ३९ नमुन्यांत उगवणक्षमता थोडी कमी आढळल्याने संबंधित कंपन्यांना ताकीद देण्यात आली.

मात्र, ६४ नमुने शासनाने घालून दिलेल्या मापदंडापेक्षा खूपच कमी दर्जाचे आढळल्याने या कंपन्यांविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली आहे.

खत आणि कीटकनाशकांमध्येही फसवणूक

मागील तीन महिन्यांत जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खतांची तपासणी करण्यात आली. त्यात ३५ नमुने अप्रमाणित आढळले.तर ४ कीटकनाशकांचे नमुनेही नापास झाले आहेत.

या प्रकरणी ३३ कंपन्यांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल होणार असल्याची माहिती विभागीय गुणनियंत्रण अधिकारी अंकुश काळशे यांनी दिली.

शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी कारवाई

शेतकरी अनेकदा कंपन्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवून महागडी बियाणे व खते विकत घेतात. मात्र, त्यांची गुणवत्ता अपुरी ठरल्यास थेट शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

त्यामुळे कृषी विभाग दरवर्षी बाजारातून व गोदामातून सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतो. यावर्षीच्या तपासणीत दोषी ठरलेल्या कंपन्यांवर कठोर कारवाई होत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : मोसंबी-संत्रा पिकाला कीटकांचा धोका जाणून घ्या उपायोजना

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीखते