बीड :खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर होणारी फसवणूक थांबवण्यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने मोठी कारवाई केली आहे. (Fake Fertilizer)
तपासणीसाठी घेतलेल्या बियाणे व खतांच्या नमुन्यांपैकी तब्बल ३३ नमुने निकृष्ट ठरले असून यातील १६ प्रकरणांत कंपन्यांविरोधात कोर्टात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Fake Fertilizer)
तपासणी अहवाल
कृषी विभागाने मागील तीन महिन्यांत बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते.
प्रकार | घेतलेले नमुने | तपासलेले नमुने | अप्रमाणित | कोर्टकेस पात्र | ताकीद पात्र |
---|---|---|---|---|---|
बियाणे | ४७४ | ३९४ | २१ | ०७ | १४ |
खते | ३०९ | २०८ | १२ | ०९ | ०३ |
कीटकनाशके | ६८ | ८६ | ०० | ०० | ०० |
यामध्ये बियाण्यांचे २१ नमुने व खतांचे १२ नमुने फेल झाले आहेत.
७ बियाणे कंपन्या व ९ खत कंपन्यांविरोधात न्यायालयीन कारवाई होणार आहे.
कीटकनाशकांचे ५४ नमुने अद्याप तपासणी प्रलंबित आहेत.
विक्रेत्यांवर कारवाई
नमुने निकृष्ट निघाल्यानंतरच नव्हे, तर विक्री प्रक्रियेतही अनियमितता आढळून आली आहे.
१५ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.
ई-पॉस मशीनवरील नोंद आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यात मोठी तफावत आढळली.
माजलगावमधील एका विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून बोगस खत विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कठोर कारवाई
दुकानदारांनी शेतकऱ्यांना ई-पॉस मशीनवरूनच खते द्यावीत. प्रत्येक विक्रीनंतर पक्की पावती देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. - वल्लभ भोसले, गुणनियंत्रण निरीक्षक
फसवणूक थांबेल का?
दरवर्षी खरीप हंगामात शेतकरी कापूस, सोयाबीन, मका यांसारख्या पिकांसाठी बियाणे व खते खरेदी करतात. पण निकृष्ट बियाणे न उगवल्याने किंवा भेसळयुक्त खतांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
कृषी विभागाने केलेली ही कारवाई शेतकऱ्यांना दिलासा देणारी असली तरी फसवणुकीचा पूर्णत: बंदोबस्त होईल का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.