लासलगाव : द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात सध्या वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेचा थेट परिणाम द्राक्ष बागांवर होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा तब्बल ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे द्राक्षांच्या घडांची प्रतवारी खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर पांढऱ्या कापडाचे आच्छादन केले आहे. लासलगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अभिषेक होळकर यांनी आपल्या शेतात हा प्रयोग केला आहे. होळकर यांची सुमारे २२ एकर शेती असून, त्यापैकी १२ एकरांवर द्राक्षबाग उभी केली आहे.
मात्र, गेल्या सहा महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने चार एकरांवरील द्राक्षबागेला फळधारणा झाली नाही. मोठा खर्च करत उर्वरित आठ एकर द्राक्षबागेपैकी चार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेवर पांढऱ्या रंगाचे कापड टाकून आच्छादन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेपासून घडांचे संरक्षण होते. परिणामी द्राक्षांची गुणवत्ता आणि प्रतवारी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे.
शेतकरी वर्गाच्या अडचणीत होतेय आर्थिक वाढपांढऱ्या कापडाचे आच्छादन उपाय शेतकऱ्यांसाठी खर्चिक ठरत आहे. द्राक्षबागेवर आच्छादन करण्यासाठी प्रतिएकर सुमारे ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च येत आहे. आधीच खत, औषधे, मजुरी आणि पाण्याच्या व्यवस्थेमुळे उत्पादन खर्च वाढलेला असताना आता या अतिरिक्त खर्चामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरीवर्गाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सध्या वातावरणातील सतत होणारे बदल, वाढती उष्णता आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे द्राक्ष शेती अधिकच आव्हानात्मक बनली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.- अभिषेक होळकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, लासलगाव
Web Summary : Nashik grape farmers use white covers to shield grapes from rising temperatures, preventing quality degradation. While effective, the method adds significantly to production costs, increasing financial strain. Farmers need technical and financial aid.
Web Summary : नाशिक के अंगूर किसान बढ़ते तापमान से अंगूरों को बचाने के लिए सफेद आवरण का उपयोग करते हैं, जिससे गुणवत्ता में गिरावट नहीं आती। प्रभावी होने के बावजूद, यह विधि उत्पादन लागत में काफी वृद्धि करती है, जिससे वित्तीय तनाव बढ़ता है। किसानों को तकनीकी और वित्तीय सहायता की आवश्यकता है।