Join us

Dragon fruit Farming : नंदुरबार जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुट लागवड वाढली, थेट बांधावरूनच होतेय विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:43 IST

Dragon fruit Farming : दुर्गम भागातही ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon fruit Farming) आता बहरू लागली आहे.

- मंगलदास पानपाटील 

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली असून नवनवीन प्रयोग राबवून भरघोस उत्पन्न घेत आहेत. शहादा तालुक्यातील पूर्व पट्टयातील असलोद-मंदाणे परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सोशल मीडिया आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन एकरभर शेतीत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. शहादा तालुक्यातील दुर्गम भागातही ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon fruit Farming) आता बहरू लागली आहे.

गेल्या दोन-तीन वर्षापासून ड्रॅगन फ्रुटची शेती वाढली आहे. विदेशी जातीचे हे फळ आरोग्यदायी समजले जाते. बाजारात प्रचंड मागणी व भरपूर भाव असल्याने या फळाच्या लागवडीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. बाजारात विदेशी व देशी अशा दोन प्रकारची ड्रॅगन फ्रूट उपलब्ध आहेत. या फळाचे तीन प्रकार असून, गुलाबी, पांढरा गर व तिसरा प्रकार पिवळा गर हे मुख्यत्वे प्रकार आहेत. 

एक एकर क्षेत्रात पिकवताहेत ड्रॅगनमंदाणे येथील शेतकरी रोहिदास सोनवणे यांनी सुरुवातीला सोशल मीडियावर ड्रॅगन फ्रूटची माहिती मिळवली. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील एका प्रगतशील शेतकरी यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन दामळदा रस्त्यावरील आदर्श शाळेजवळ असलेल्या एक एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यांनी गेल्या वर्षी १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळत असल्याने गावातील इतर चार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. 

शेतीच्या बांधावरच होते फळाची विक्री...वर्षभर राबराब राबून शेतात पिकवलेले उत्पादन काढणीनंतर त्याला मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जावे लागते. तेथे गेल्यावरही योग्य भाव मिळेलच याची शाश्वती नसते. यामुळे मंदाणे येथील शेतकरी शेतीच्या बांधावरच व्यापारी तसेच किरकोळ विक्रेत्यांना ठोक भावात ड्रॅगन फ्रूट विक्री करत आहेत. शेतीच्या बांधावर १०० ते १५० रुपये प्रति किलो दराने शेतकरी फ्रूट विक्री करत आहेत.

लागत खर्च कमी, उत्पन्न मिळते जास्त...ड्रॅगन फ्रूटसाठी कोरडे हवामान, कमी पावसात येणारे पीक, निचरा होणारी जमीन व साबरसदृश हे झाड असल्याने फारशी मशागत किंवा कीटकनाशके, जंतुनाशके फवारण्याची गरज पडत नाही. यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्चही करावा लागत नाही. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान देशी ड्रॅगन फ्रूट बाजारात येते, दुसरा हंगाम नोव्हेंबर, डिसेंबरपासून पुढील तीन महिने असतो. या झाडाची फांदी काढून जमिनीत लावल्यास दोन वर्षांनंतर फुले येतात व अडीच वर्षांनंतर उत्पादन होण्यास सुरुवात होते.

सोप्या पद्धतीने साबरीसारख्या फळाची फांदी जमिनीत लावल्यास दोन वर्षांनंतर फुले येतात. अडीच वर्षांच्या आसपास फळे येण्यास सुरुवात होते. सुरुवातीला नियमित पाणी घालावे लागते. फारसे इतर कष्ट घ्यावे लागत नाहीत. अतिशय सुंदर व चविष्ट फळे येत असल्याने बाजारात मागणी आहे. वर्षाकाठी किमान आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.- रोहिदास सोनवणे, ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी, मंदाणे, ता. शहादा.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीफलोत्पादनपीक व्यवस्थापन