Join us

Dhan Kharedi : धानाची उघड्यावरच साठवणूक, गोदामांची सोय नव्हती तर खरेदी करायची कशाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:29 IST

Dhan Kharedi : शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेले धान मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे.

गडचिरोली : आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत खरेदी केलेल्या धानाची (Dhan Kharedi) उघड्यावरच साठवणूक केली आहे. अवकाळी पावसाचे संकट अजून दूर झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेले धान मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्हा धान (Paddy Production) उत्पादनात अग्रेसर असून, दरवर्षीच हंगामात खरेदी व भरडाईतील गैरव्यवहार चर्चेत असतो. यंदा देऊळगाव (ता. कुरखेडा) येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या केंद्रावर धान खरेदीत Bhat Kharedi) चार कोटींचा गैरव्यवहार उजेडात आला. या प्रकरणी उपप्रादेशिक व्यवस्थापक एम.एस. बावणेंसह १७ जणांवर गुन्हा नोंद झालेला आहे. 

यानंतर आरमोरीतील एक व देसाईगंजातील तीन भरडाई केंद्रांवर देखील गैरव्यवहार समोर आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. खरेदी प्रक्रियेत आदिवासी विकास विभागाने दाखविलेल्या निष्काळजीमुळे धान उघड्यावरच आहे. धान उचल करण्यास दिरंगाई कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

गोदाम, शेड बांधकाम करण्यास अडचणी काय ?जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेरडेशनच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. दरवर्षी ही खरेदी मोकळ्या जागेत करून त्यावर ताडपत्री झाकून पावसाळ्यात धानाचे संरक्षण केले जाते. मात्र वादळवारा, पावसामुळे ताडपत्री फाटून धान भिजते. यात मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मग धान खराब झाल्याचे कारण दाखवून तूट दाखवली जाते. याच माध्यमातून अफरातफर होत असते.

धान ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम नव्हते तर खरेदी करायचीच नव्हती. शेतकरी बांधवांनी घाम गाळून पिकविलेल्या धानाची पावसामुळे नासाडी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.- संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीभातगडचिरोली