Dhan Kharedi : नागपूर जिल्ह्यात सन २०२५–२६ च्या खरीप हंगामासाठी धान खरेदीचे एक लाख क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ८ जानेवारीपासून शासकीय खरेदी केंद्रांवरील धान खरेदी बंद करण्यात आली आहे.
मात्र, जिल्ह्यातील तब्बल ४६ हजार ९६३ नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील मोठ्या प्रमाणातील धानाची खरेदी अद्याप शिल्लक असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्याची धान खरेदी मर्यादा किमान पाच लाख क्विंटल करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
२७ खरेदी केंद्रे, पण उद्दिष्ट अत्यल्प
सन २०२५–२६ हंगामासाठी नागपूर जिल्ह्यात एकूण २७ शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवर ४८ हजार ६२ शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीने (MSP) धान विक्रीसाठी नोंदणी केली होती. यापैकी आतापर्यंत केवळ २ हजार ५७१ शेतकऱ्यांकडील १,०१,२१४.२० क्विंटल धानाचीच खरेदी पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्ह्याला शासनाकडून एक लाख क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे ८ जानेवारीपासून धान खरेदी बंद करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी दिली.
नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या वाढतेय
दरम्यान, धान नोंदणीस मुदतवाढ देण्यात आल्याने जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूर जिल्ह्यात यावर्षी ९६,९९८.२९ हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, प्रतिहेक्टर सरासरी उत्पादकता ४० क्विंटल (प्रतिएकर सुमारे १६ क्विंटल) धरल्यास जिल्ह्यात यंदा ३८ लाख ७९ हजार ९३१.६० क्विंटल धान उत्पादन अपेक्षित आहे.
किमान २५ टक्के खरेदी अपेक्षित, प्रत्यक्षात मात्र तफावत
एकूण अपेक्षित उत्पादनाच्या किमान २५ टक्के धानाची खरेदी किमान आधारभूत किमतीने व्हायला हवी. त्या हिशेबाने नागपूर जिल्ह्यातून सुमारे ९,६९,९८२.९० क्विंटल धानाची खरेदी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात जिल्ह्याला केवळ ९८,१४६.६० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या तफावतीमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
रोष टाळण्यासाठी मर्यादा वाढवण्याची गरज
सध्या ४६ हजार ९६३ नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी शिल्लक असून, खरेदी बंद राहिल्यास शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा पणन कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धान खरेदी ८ मार्चपर्यंत सुरू ठेवावी तसेच खरेदी मर्यादा वाढवावी, अशी शिफारस केली होती.
राज्य सरकारकडे थेट मागणी
या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवून नागपूर जिल्ह्याचे धान खरेदी उद्दिष्ट किमान पाच लाख क्विंटल करण्याची ठाम मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Nagpur's paddy procurement halted after reaching target, leaving farmers stranded. District requests 5 lakh quintal increase to aid 46,000 registered farmers facing losses. Low procurement against high production creates unrest. Collector urges quick government action.
Web Summary : लक्ष्य पूरा होने पर नागपुर में धान की खरीद रुकी, किसान फंसे। जिले ने 5 लाख क्विंटल की वृद्धि का अनुरोध किया ताकि 46,000 पंजीकृत किसानों को नुकसान से बचाया जा सके। उच्च उत्पादन के मुकाबले कम खरीद से अशांति। कलेक्टर ने त्वरित सरकारी कार्रवाई का आग्रह किया।