Join us
Daily Top 2Weekly Top 5

DAP Demand Increase : डीएपी विक्रीत विक्रमी उसळी; वाशिममध्ये नेमकं काय सुरू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:40 IST

DAP Demand Increase : वाशिम जिल्ह्यात केवळ ९ दिवसांत डीएपी खताच्या विक्रीत तब्बल ४०३० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या असामान्य वाढीमागे साठेबाजी किंवा काळाबाजाराचा संशय व्यक्त होत असून, कृषी विभागाने ‘मिशन मोड’वर तपासणी सुरू केली आहे. अनेक दुकानांवर छापेमारी आणि शेतकऱ्यांच्या बांधावर तपासणीमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. (DAP Demand Increase)

वाशिम : जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात 'डीएपी' खताच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ नोंदली गेली असून, केवळ ९ दिवसांत विक्रीत तब्बल ४०३० टक्क्यांची उसळी दिसून आली आहे.(DAP Demand Increase)

या असामान्य वाढीची गंभीर दखल घेत कृषी विभागाने 'मिशन मोड'वर तपासणी मोहीम सुरू केली आहे. (DAP Demand Increase)

संशयित व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ३१ कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेण्यात आली असून, १२ केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.(DAP Demand Increase)

९ दिवसांत ५५५ मेट्रिक टन खताची विक्री

१ ते ९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात ७८४ शेतकऱ्यांनी एकूण ५५५ मेट्रिक टन डीएपी खताची खरेदी केल्याची नोंद आहे.

गतवर्षी याच कालावधीत केवळ १३ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्यामुळे यंदाच्या विक्रीतील प्रचंड वाढ लक्षवेधी ठरली आहे.

विशेष म्हणजे, यातील १८५ शेतकऱ्यांनी प्रत्येकी २० गोण्यांपेक्षा अधिक (१ मेट्रिक टनपेक्षा जास्त) खत खरेदी केले असून, या मोजक्याच शेतकऱ्यांनी एकूण विक्रीपैकी सुमारे २५२.७ मेट्रिक टन साठा उचलल्याचे समोर आले आहे.

साठेबाजी आणि वळतीकरणाचा संशय

खताचा काळाबाजार किंवा औद्योगिक वापरासाठी वळतीकरण होत असल्याच्या संशयावरून केंद्र शासनाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी (जि.प.) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासणी मोहीम हाती घेतली.

३९ संशयित दुकानांपैकी ३१ दुकानांची तपासणी पूर्ण करण्यात आली. या तपासणीत ई-पॉस (E-POS) पोर्टलवरील नोंदी आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे संशय अधिकच गडद झाला आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावरही पडताळणी

जास्त प्रमाणात खत खरेदी करणाऱ्या १८५ शेतकऱ्यांपैकी ११६ शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कृषी विभागाने प्रत्यक्ष पडताळणी केली. या तपासणीचा उद्देश साठेबाजी किंवा गैरवापर होत आहे का, हे तपासणे हा होता.

कडक कारवाईचा इशारा

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणत्याही व्यापाऱ्याने खताचा काळाबाजार केल्यास 'जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५' अंतर्गत थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच शेतकऱ्यांनीही भीतीपोटी साठेबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

खतांचा तुटवडा नसल्याचा प्रशासनाचा दावा

आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खतांचा तुटवडा निर्माण होईल, अशा अफवा सध्या पसरत आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, खरीप २०२६ साठी वाशिम जिल्ह्यास ७८,७०० मेट्रिक टन खतांचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही.

एकीकडे खतांच्या विक्रीत झालेली असामान्य वाढ आणि दुसरीकडे साठेबाजीच्या संशयामुळे कृषी विभाग सतर्क झाला आहे.

तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असून, दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी अफवांपासून दूर राहून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Fertilizer Distribution : खत वाटपात आता पारदर्शकता येणार; कृषी विभागाचा साठ्यावर राहणार 'वॉच'

अधिक वाचा : Fertilizer Shortage : आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका; यंदाचा खरीप हंगाम अडचणीत?

English
हिंदी सारांश
Web Title : Washim Sees Unprecedented DAP Fertilizer Demand, Sparks Investigation Amidst Suspicions

Web Summary : Washim's DAP fertilizer sales surged 4030% in nine days, prompting a probe into suspected hoarding. Agricultural officials inspected shops, finding discrepancies in stock. Farmers are being checked for misuse. Strict action is promised against black market activities; adequate fertilizer supply assured.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीखते