जळगाव : केळी पिकावर कुकंबर मोझॅक विषाणूजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत असून केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. विविध प्रकारच्या रासायनिक व कीटकनाशक फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत असून कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
बाळद परिसर बागायती पट्टा म्हणून ओळखला जात असून केळी हे येथील प्रमुख पीक आहे. येथे मृग व कांदे अशा दोन हंगामात केळीची लागवड केली जाते. सध्या मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेल्या केळीवर कुकंबर मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दोन ते तीन महिन्यांच्या झाडांवर नवीन पाने पिंगट रंगाची व लहान आकाराची निघत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करूनही रोगावर नियंत्रण मिळत नसल्याने काहींना बाधित झाडे उपटून टाकावी लागत आहेत.
रब्बी हंगाम अवकाळीने प्रभावित अन् आता...?आधीच खरीप हंगाम परतीच्या पावसामुळे व रब्बी हंगाम अवकाळी पावसामुळे प्रभावित झाला असताना आता केळी पिकावर आलेल्या या रोगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून अद्याप ठोस मार्गदर्शन मिळाले नसल्याने बाळद परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
युध्दजन्य परिस्थितीमुळे केळीचे भाव गडगडलेएकीकडे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेवर होत असून केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीत. त्यातच दुसरीकडे केळी पिकांवर कुंकबर मोझेंकसारख्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
केळी पिकावर पडलेल्या रोगामुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी झाडे उपटून टाकावी लागत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी नव्हे तर तिहेरी संकटात सापडला असून आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि अचानक तापमानवाढ यामुळे केळी पिकावर कुकंबर मोॉक रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.- सुधाकर कराड, तालुका कृषी अधिकारी, पाचोरा
Web Summary : Jalgaon banana farmers face Cucumber Mosaic Virus, causing crop damage and financial strain. Pesticides fail, prompting calls for agricultural department guidance amidst market downturns.
Web Summary : जलगाँव के केले किसान कुकुम्बर मोज़ेक वायरस का सामना कर रहे हैं, जिससे फसल को नुकसान और वित्तीय तनाव हो रहा है। कीटनाशक विफल, बाजार में गिरावट के बीच कृषि विभाग के मार्गदर्शन का आह्वान।