Join us
Daily Top 2Weekly Top 5

Crop Pest Attack : तूर, कापूस, हरभऱ्यावर किडींचा वाढता प्रादुर्भाव; एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:05 IST

Crop Pest Attack : बदलत्या हवामानाचा परिणाम आता थेट शेतीवर दिसून येत आहे. ढगाळ वातावरण व आर्द्रतेमुळे परभणी जिल्ह्यातील तूर, कापूस व हरभरा या प्रमुख रब्बी पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कापसावर लाल्या, तुरीवर शेंगा पोखरणारी अळी तर हरभऱ्यावर मररोग पसरत असल्याने शेतकरी महागड्या कीटकनाशकांच्या फवारणीकडे वळले असून, उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.(Crop Pest Attack)

परभणी : वातावरण बदलाचा परिणाम केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर शेती पिकांवरही तीव्रतेने होत असल्याचे चित्र सध्या परभणी जिल्ह्यात दिसून येत आहे. (Crop Pest Attack)

ढगाळ वातावरण, आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे कापूस, तूर आणि हरभरा या प्रमुख पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. (Crop Pest Attack)

कापसावर लाल्या रोग, तुरीवर अळीचा प्रादुर्भाव, तर हरभऱ्यावर मररोग आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे.(Crop Pest Attack)

सध्या जिल्ह्यातील तूर पीक बहर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. काही भागात शेंगा लागण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. (Crop Pest Attack)

त्याचबरोबर कापसावर लाल्या रोगाने डोके वर काढले असून, हरभऱ्याच्या पिकावर मररोगाचा फैलाव होत आहे. परभणी तालुक्यातील झरी, मांगणगाव परिसरात या कीड-रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येत आहे.

कीड नियंत्रणासाठी वाढलेला खर्च

कीड व रोगांचा फैलाव रोखण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर विविध कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करीत आहेत. त्यामुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात आणखी भर पडत आहे. 

हरभऱ्यावरील मररोग नियंत्रणासाठी ॲझोक्सीस्ट्रोबिन, थायोफेनेट-मिथाइल, प्रोथियोकोनाझोल, कार्बेन्डाझिम हे घटक असलेली बुरशीनाशके फवारल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो, असे मार्गदर्शन कृषी सेवक एन. आर. लिंगायत यांनी केले आहे. तसेच कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

खरिपानंतर रब्बीकडून अपेक्षा, पण अडचणी वाढल्या

खरीप हंगामात अतिवृष्टी व अन्य कारणांमुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांची मोठी आशा रब्बी हंगामावर होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस काढून हरभरा, गहू, ज्वारी या पिकांची पेरणी केली आहे. 

परिणामी यंदा रब्बीचे क्षेत्र वाढले असले, तरी बदलत्या हवामानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कीड नियंत्रणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाची गरज

कृषी तज्ज्ञांच्या मते, तुरीवरील किडी फुले व शेंगांवर थेट आक्रमण करीत असल्याने एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) महत्त्वाचे ठरत आहे. 

त्यासाठी प्रतिहेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत

पक्षी किडींच्या अळ्या खाऊन नष्ट करतात

घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत

आवश्यकता भासल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कीटकनाशकांची फवारणी करावी

शेतकऱ्यांची मागणी : मार्गदर्शनाची गरज

खंडाळी परिसरात बहरात असलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी अंदाजाने विविध कीटकनाशके फवारत असून, यामुळे खर्च वाढण्यासह पिकांचे नुकसान होण्याचीही भीती आहे. कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतात भेट देऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तुरीचे क्षेत्र व उत्पादन धोक्यात

जिल्ह्यात जवळपास ५ लाख हेक्टर पेरणी क्षेत्र असून, खरीप हंगामात अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात. यंदा जिल्ह्यात सुमारे ६ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. 

सध्या अनेक भागांत तूर फुलोरा व शेंगा अवस्थेत असतानाच किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एकूणच, बदलत्या हवामानामुळे पिकांवरील कीड-रोगांचे संकट वाढत असून, वेळीच योग्य उपाययोजना व प्रभावी मार्गदर्शन झाले नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : हवामान बदलाचा बसतोय 'हापूस'ला फटका; यंदा आंब्याचे उत्पादन, गुणवत्ता आणि हंगामाचे वेळापत्रक विस्कटले

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Pest Attack: Integrated pest management needed for cotton, lentils.

Web Summary : Parbhani farmers face rising pest attacks on cotton, lentils, and chickpeas due to fluctuating weather. Integrated pest management is crucial to minimize losses as farmers spend more on pesticides. Agriculture department guidance urged.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनतूरहरभरापीकशेतकरी