Join us

Jalgaon District Bank : यंदा केळीला सव्वा लाखांचे कर्ज, कापूस अन् ऊसाला किती? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:38 IST

Jalgaon District Bank : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीने यंदा पीक कर्जात (Crop Loan) १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव : चालू वर्षात खरीप आणि रब्बीसाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे (Crop Loan) उद्दिष्ट जिल्हा बँकेने निश्चित केले आहे. केळीसाठी (Banana Crop Loan) हेक्टरी १ लाख १५ हजार, उसाला ९६ हजार ८००, तर बागायती कापसासाठी ५५ हजार ६०० रुपये कर्ज वितरित केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीने यंदा पीक कर्जात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने तीन लाखांपर्यंतचे (Jalgaon District Bank) कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून दिले. एक लाख ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादत विहित मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास व्याज माफ करण्याचा निर्णय बँकेने घेतला असून आगामी वर्षासाठीही तो लागू राहणार आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा बँकेने यंदा कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. यंदा म्हणजेच २०२५-२६ या वर्षासाठी केळी पिकासाठी १ लाख १५ हजार रुपये, बागायत कापूस ५५ हजार ६०० रुपये, जिरायती कापूस ४८ हजार ४०० रुपये तर ऊस पिकासाठी ६९ हजार ८०० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

असे होते मागील वर्षी दरमावळत्या आर्थिक वर्षात बागायत कापसाला ५० हजार ६००, जिरायत कापसाला ४४ हजार, उसाला ८८ हजार, केळीला १ लाख ४ हजार ५००, सोयाबीनला ३६ हजार, भूईमुगाला ३२ हजार, सूर्यफुलाला २३ हजार, कांदा-बटाटा ६६ हजार, ज्वारीला २४ हजार, बाजरीला २० हजार, तर तुरीला २५ हजार रुपये कर्ज दिले जात होते, यंदा त्यात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत पीक कर्ज अगदी नगण्य मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.

फळपिकांसाठी मर्यादा वाढवाभाजीपाला, फळ व फुलपिकांसाठी कर्जाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी पपईसाठी ३५ हजार, द्राक्ष लागवडीसाठी अडीच लाख, टरबुजासाठी २५ हजार, संत्री व मोसंबीसाठी ७० हजार, तर डाळिंबासाठी एक लाख रुपये कर्ज निश्चित करण्यात आले होते. त्यात दहा टक्के वाढ झाली. केळी, लिंबू व कापसासाठी कर्जाची मर्यादा खूपच कमी असल्याने ती वाढविण्यात यावी, अशी अपेक्षा वडलीचे शेतकरी शेषराव रामकृष्ण पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आपल्याकडे कापूस, केळी आणि ऊस हीच पिके प्रामुख्याने घेतली जातात. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पीक कर्जात १० टक्के वाढ झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने हे धोरण ठरविले आहे. काही पिकांना अल्प प्रमाणात कर्ज वाटप होत असले तरी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ.- संजय पवार, चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक

टॅग्स :पीक कर्जकेळीजळगावकापूसऊस