Join us

Crop Insurance : शासनाच्या नवीन नियमांनी शेतकरी हैराण; विम्याची रक्कम कधी मिळणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:50 IST

Crop Insurance : राज्य शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यंदा बीड जिल्ह्यातील सुमारे ५.९० लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली असली तरी, आता भरपाई कापणी प्रयोगानंतरच ठरणार आहे. पूर्वीप्रमाणे २५% आगाऊ रक्कम मिळणार नसल्याने शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत.(Crop Insurance)

Crop Insurance : खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, आता त्यांना विमा भरपाई मिळण्यास नवीन अडथळे निर्माण झाले आहेत. राज्य शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. (Crop Insurance)

जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ९० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असली, तरी आता पीक कापणी प्रयोग झाल्यानंतरच भरपाईची रक्कम ठरवली जाणार आहे.(Crop Insurance)

२०२२ पासून १ रुपयात पीक विमा

राज्य सरकारने २०२२ पासून शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. त्यातील शेतकऱ्यांचा विमा हप्ता केंद्र व राज्य सरकारकडून भरला जात होता. 

मात्र, मागील काही वर्षांत बोगस पीक विमा प्रकरणे मोठ्या प्रमाणात उघडकीस आली होती. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने २०२५ च्या खरीप हंगामापासून नवीन निकष लागू केले आहेत.

आगाऊ भरपाई बंद

यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून २५ टक्के आगाऊ रक्कम भरपाईपोटी दिली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळत असे. मात्र, शासनाने या वर्षापासून ही तरतूद रद्द केली आहे.

आता केवळ कापणी प्रयोगावर भरपाई

कृषी विभागामार्फत दरवर्षी पीक कापणी प्रयोग केला जातो. यंदापासून या प्रयोगातील उत्पादनाच्या आकडेवारीवरच भरपाई ठरणार आहे. त्यामुळे नुकसानीच्या तात्काळ भरपाईऐवजी, शेतकऱ्यांना आता पिके कापणी झाल्यावरच विमा रक्कम मिळणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

बीड जिल्ह्यातील १७ लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास १० लाख शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात पीक विमा भरला आहे. मात्र, नवीन नियमांची माहिती बहुतेकांना नसल्यामुळे शेतकरी संभ्रमात आणि चिंतेत आहेत. अतिवृष्टीमुळे आधीच हवालदिल झालेले शेतकरी आता विमा भरपाईबाबत अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Dam Water Level Maharashtra : सप्टेंबरच्या पावसाने लघु प्रकल्प तुडुंब; रब्बी हंगामाला येणार गती वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Crop insurance payout amount to be determined after harvest.

Web Summary : Maharashtra's changed crop insurance norms impact farmers. Payouts depend on post-harvest crop cutting experiments due to increased bogus claims. Advance payment provision removed. About 10 lakh farmers in Beed paid insurance.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक विमा