अझहर अली
सप्टेंबर महिना संपत आला असतानाही गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा भरपाई अजूनही बळीराजाच्या खात्यात जमा झालेली नाही. (Crop Insurance Delay)
संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ४२ हजार ६०९ शेतकरी अजूनही २६ कोटी ९७ लाख ६६ हजार ५६५ रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपनीकडून होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून नव्या हंगामातही अडचणी वाढल्या आहेत.(Crop Insurance Delay)
आर्थिक अडचणीत शेतकरी
गतवर्षी पावसाचा खंड आणि नंतर अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, मका आणि तूर यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती.
पण, भरपाईचा लाभ मिळण्यास विलंब झाल्याने त्यांचे कर्जफेड, नव्या हंगामाचे नियोजन आणि शेतीसाठी लागणारे खर्च अडचणीत आले आहेत.
पीक विमा वितरणाची सद्यस्थिती
संग्रामपूर तालुक्यात ५३ हजार १५० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४४ हजार २१४ शेतकरी पात्र ठरले, तर ८ हजार ९३६ अपात्र ठरले. पात्र लाभार्थ्यांना ३० कोटी ७६ लाख ३२ हजार ८६२ रुपये मंजूर झाले आहेत.
मात्र, आजतागायत केवळ १ हजार ६०५ शेतकऱ्यांच्या खात्यात ३ कोटी ७८ लाख ६६ हजार २९६ रुपये जमा झाले आहेत. उर्वरित ४२ हजार ६०९ शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल.
अपात्रतेचे निकष गुलदस्त्यात!
शेतकऱ्यांचा प्रश्न कायम आहे की, एकाच पावसाने सर्वत्र समान नुकसान झाले, तरी काही शेतकरी अपात्र कसे ठरले? अपात्रतेचे निकष स्पष्ट न केल्याने नाराजी वाढत आहे. शेतकरी संघटनांनी पारदर्शकतेची मागणी केली असून पीकविमा कंपन्यांनी विलंब आणि नियम फेरफार थांबवावेत, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांची अपेक्षा आणि प्रशासनाची भूमिका
शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की, उर्वरित रक्कम तत्काळ खात्यात जमा व्हावी, जेणेकरून रब्बी हंगामाची तयारी सुरळीत होईल. प्रशासनाकडून विमा कंपन्यांना गती देण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील, हे अजूनही अस्पष्ट आहे.
आकडेवारी
एकूण तक्रारी : ५३ हजार १५०
पात्र लाभार्थी : ४४ हजार २१४
अपात्र शेतकरी : ८ हजार ९३६
एकूण मंजूर रक्कम : ३०.७६ कोटी
वितरित रक्कम : ३.७८ कोटी (१,६०५ शेतकरी)
प्रलंबित शेतकरी : ४२ हजार ६०९
प्रलंबित रक्कम : २६.९७ कोटी
गेल्या वर्षीच्या पीकविम्यासाठी पात्र ४४ हजार २१४ शेतकऱ्यांपैकी १ हजार ६०५ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाली आहे. उर्वरित ४२ हजार ६०९ लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल.- प्रशांत पाटील, तहसीलदार, संग्रामपूर
Web Summary : Sangrampur farmers await ₹27 crore in crop insurance due to delays. 42,609 farmers face financial strain as promised compensation remains unpaid, disrupting financial planning after crop losses.
Web Summary : संग्रामपुर के किसान फसल बीमा के 27 करोड़ रुपये का इंतजार कर रहे हैं। 42,609 किसानों को वित्तीय संकट का सामना करना पड़ रहा है क्योंकि वादा किया गया मुआवजा अभी तक नहीं मिला है, जिससे फसल नुकसान के बाद वित्तीय योजना बाधित हो गई है।