Join us

Bogus Pik Vima : नाशिकमध्ये चार कोटींचा बोगस पीकविमा घोटाळा उघड, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:23 IST

Bogus Pik Vima : बोगस पीकविमा (Crop Insurance) दाखवत शासनाला चार कोटी रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक : मालेगाव तालुक्यात चालू खरीप हंगामात (Kharif Season) सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावर बोगस पीकविमा (Crop Insurance) दाखवत शासनाला चार कोटी रुपयांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्यात तालुक्यातील १०७ शेतकऱ्यांसह ग्राहक सेवा केंद्र व सर्वे करणारे काही कंत्राटी कर्मचारी सहभागी असून सदर शेतकऱ्यांचे अर्ज रद्दबातल ठरवत त्यांच्यावर पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाने राज्य शासनाला अहवाल पाठविला आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) शासनाकडून एक रुपयात पीकविमा योजना राबवली जाते. चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. कृषी विभागाकडून या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असताना मालेगाव तालुक्यात सुमारे १०७ शेतकऱ्यांनी बोगस पीकविमा (bogus Pik Vima) काढल्याचे उघड झाले. ७१ शेतकऱ्यांनी ४२२ हेक्टर जमिनीवर पीक दाखवून विम्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला तर ३६ शेतकऱ्यांनी त्यांच्या एकूण क्षेत्रापेक्षा अधिक बोगस क्षेत्र दाखवत पीकविमा लाटण्याचा प्रकार केला आहे. 

यामध्ये ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसह विमा कंपनीकडून सर्वे करणारे कंत्राटी कर्मचारीदेखील सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. त्यातही काही शेतकऱ्यांनी शेती महामंडळाच्या जागेसह अकृषक जमिनींवरही पिके दाखवली आहेत. अशा प्रकारे सुमारे १०७ शेतकऱ्यांनी सुमारे ५०० हेक्टरवर बोगस पिके दाखवून शासनाकडून रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला असल्याचे पडताळणीत समोर आले आहे. पडताळणीनंतर विमा कंपनीसह कृषी विभागाने त्यावर अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे.

अर्ज केले रद्दबातल एक रुपयात पीक विमा काढताना सुमारे ५०० हेक्टरवर हा बोगस प्रकार केल्याचे समोर आले आहे. शासनाकडून या योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाईपोटी प्रति हेक्टर ८१ हजार रुपये दिले जातात. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांकडून सुमारे ४ कोटी रुपयांना गंडा घालण्याचा हा प्रकार समोर आला. कृषी विभागाने यासंदर्भात पडताळणीनंतर सदर शेतकऱ्यांचे बोगस अर्ज रद्दबातल केले असून संबंधितांवर पुढील कार्यवाही प्रस्तावित केली आहे.

एक रुपयात पीक विम्याबाबत चालू खरीप हंगामासंदर्भात हा प्रकार उघडकीस आला आहे. शासन आदेशाने प्राप्त अर्जाची पडताळणी केली जात आहे. त्यात सुमारे ४ कोटी रुपयांची ही तफावत आढळून आली आहे. कृषी विभागाने शासनाला अहवाल सादर केला असून त्यासंदर्भात केंद्राकडे माहिती जाऊन पोर्टलवरून संबंधितांची माहिती वगळली जाईल, संबंधितांवर पुढील कारवाई शासनच करेल. - भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव 

Rabbi Kanda : रब्बी कांदा रोपवाटिका तयार करताना 'हे' विसरू नका, वाचा सविस्तर

 

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रकृषी योजनाशेती