Join us

Crop Damage : दोन नाही, आता तीन हेक्टर नुकसानीची होणार नोंद; मदतीच्या यादीत नव्या शेतजमिनींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:39 IST

Crop Damage : राज्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आता तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीवर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. (Crop Damage)

रूपेश उत्तरवार

राज्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा करत दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानावर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Crop Damage)

यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक आधार मिळणार आहे.(Crop Damage)

यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सहा लाख हेक्टर क्षेत्राचे झालेले नुकसान आता तीन हेक्टरपर्यंत मदतीस पात्र ठरणार आहे. (Crop Damage)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे २.६७ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, कृषी विभागाला सुधारित अहवाल राज्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(Crop Damage)

अतिवृष्टीने १०५ मंडळांवर तडाखा

मागील काही महिन्यांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील १०५ मंडळांमध्ये तब्बल ६ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 

कृषी विभागाने सुरुवातीला केंद्राच्या निकषानुसार फक्त २ हेक्टरपर्यंतचे नुकसान नोंदवले होते. त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे आता तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीची नोंद पुन्हा घ्यावी लागणार आहे.

सुधारित अहवाल राज्याला सादर होणार

कृषी विभागाने यापूर्वी दोन हेक्टर निकषानुसार नुकसानाचा अहवाल राज्याला पाठवला होता. आता नवीन निर्णयानुसार सुधारित अहवाल तयार करून राज्य शासनाकडे सादर करावा लागणार आहे. जिल्ह्यात नुकसानाचे क्षेत्र वाढणार असून, त्यानुसार मदतीचा निधीही वाढण्याची अपेक्षा आहे.

२.६७ लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत

यवतमाळ जिल्ह्यात एकूण २ लाख ६७ हजार २०० शेतकऱ्यांचे सहा लाख १० हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.

ऑगस्टमध्ये : २ लाख १० हजार हेक्टर

सप्टेंबरमध्ये : २ लाख ४१ हजार हेक्टर

सततच्या पावसामुळे : १२ हजार हेक्टर

जून-जुलैमध्ये : १२०० हेक्टर

या सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदतीचा लाभ मिळणार आहे.

मदतीच्या रक्कमेत वाढ

मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजानुसार,

कोरडवाहू क्षेत्र : १८ हजार ५०० रु. प्रति हेक्टर

बारमाही बागायती क्षेत्र : २७ हजार रु. प्रति हेक्टर

बागायती क्षेत्र : ३२ हजार ५०० रु. प्रति हेक्टर

पूर्वीच्या निकषानुसार केवळ ८ हजार ५०० रु. प्रति हेक्टर मदत मिळत होती.

मात्र संपूर्ण नुकसान ग्राह्य नाही

सरकारने मदत देण्याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत ठेवली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे १० ते २० एकर क्षेत्राचे नुकसान झाले असले, तरी त्यांना केवळ ७.५० एकर क्षेत्रावरच नुकसानभरपाई मिळणार आहे. उर्वरित नुकसान त्यांना स्वतः सहन करावे लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा

अतिवृष्टी, कीडनाशक खर्च आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात सकारात्मक आणि दिलासादायक ठरणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत केव्हा आणि कशी मिळते, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गाईडलाईन्स प्राप्त होताच त्यानुसार अहवाल दुरुस्तीची कार्यवाही सादर करावी लागेल. याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तो अहवाल तयार करून प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया लवकरच होईल.- संतोष डाबरे, कृषी अधीक्षक, यवतमाळ

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापसाच्या भाववाढीचा वेग खूपच मंद; खर्च गगनाला भिडला

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीयवतमाळ