Join us
Daily Top 2Weekly Top 5

Crop Damage : ७ दिवस झाले… पंचनामे कधी? गारपीटग्रस्त शेतकरी संतापला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:35 IST

Crop Damage : एका रात्रीत गारपिटीने शेतकऱ्यांची उभी शेती जमीनदोस्त केली… कष्ट, आशा आणि स्वप्नं सगळं काही उद्ध्वस्त झालं. पण या जखमेवर मलम लावण्याऐवजी प्रशासनच गायब झाल्याचं चित्र समोर आलं आहे. सात दिवस उलटले तरी पंचनामे झाले नाहीत, आणि मदतीची वाट पाहत शेतकरी हतबलपणे आक्रोश करत आहेत. (Crop Damage)

Crop Damage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेकडो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Crop Damage)

मात्र, या नैसर्गिक आपत्तीला आठवडा उलटूनही अनेक गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.(Crop Damage)

चिंचोली लिंबाजी परिसरासह बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, जामडी जहागीर, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी, टाकळी अंतूर, लोहगाव, वडोद, घाटशेंद्रा, नेवपूर आणि वाकी तळणेर या भागात गारपिटीने मोठा तडाखा दिला. 

रब्बी हंगामातील गहू, मका आणि कांदा पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

रब्बी पिकांवर पाणी; शेतकऱ्यांची आशा मावळली

खरीप हंगामात आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. 

मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उभ्या पिकांवर अक्षरशः पाणी फिरले. अनेक ठिकाणी गहू, मका आणि कांदा पूर्णपणे आडवा झाला असून उत्पादनाची आशा संपुष्टात आली आहे.

पंचनामे रखडले; मदतीचा मार्ग बंद

नुकसान झाल्यानंतर तातडीने पंचनामे होणे अपेक्षित असताना, सात दिवस उलटूनही अनेक गावांमध्ये महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी पोहोचलेले नाहीत. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत लांबणीवर पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

आमदारांच्या आदेशांकडेही दुर्लक्ष?

नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार संजना जाधव यांनी घटनेनंतर त्वरित पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. 

मात्र, त्यांच्या निर्देशांनंतरही प्रशासन हलले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांची हतबलता; आंदोलनाचा इशारा

“माझ्या शेतातील गहू, मका आणि कांदा पूर्णपणे आडवा झाला आहे. सात दिवस झाले तरी एकही अधिकारी पाहणीसाठी आला नाही. नुकसान पाहून डोळ्यात पाणी येते, पण प्रशासन मात्र ढिम्म आहे,” अशी व्यथा चिंचोली लिंबाजी येथील शेतकरी कडुबा वाढेकर यांनी व्यक्त केली.

तातडीच्या मदतीची मागणी

पंचनामे लवकर न झाल्यास मदतीची प्रक्रिया आणखी विलंबित होईल, अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गारपिटीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका बसत आहे. तातडीने पंचनामे करून मदत दिली नाही, तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Crop Damage : अवकाळीचा कहर! गहू आडवा, कांदा भिजला; संत्रा बागा उद्ध्वस्त

अधिक वाचा : Gaalmukt Dharan Gaalyukt Shivar 2.0 : धरणातून निघाला खजिना; 'या' योजनेने शेतं झाली सोन्यासारखी सुपीक

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती