Join us

देशातील पहिला बहु-उद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्प, काय आहेत वैशिष्ट्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 5:28 PM

भारतातील पहिल्यावहिल्या बहु-उद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

हिमाचल प्रदेशमध्ये झाकरी येथील नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रात (एनजेएचपीएस) मध्ये 1,500 मेगावॅट क्षमतेच्या भारतातील पहिल्यावहिल्या बहु-उद्देशीय (उष्णता व विद्युत दोन्हींसाठी संयुक्त) हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्या माध्यमातून निर्माण होणारा हरित हायड्रोजन, एनजेएचपीएस  मधील ज्वलन-इंधनाची गरज भागवण्यासाठी अतिवेगवान ऑक्सिजन इंधन आवरण सुविधेमध्ये वापरला जाणार आहे.

देशातील पहिल्या बहु-उद्देशीय (उष्णता व विद्युत दोन्हींसाठी संयुक्त) हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर यांच्या हस्ते 24 एप्रिल 2024 ला झाले. या प्रकल्पाबद्दल अध्यक्ष कपूर म्हणाल्या, "भारत सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाला अनुसरून एसजेव्हीएनचा हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्प, विद्युतक्षेत्रात हरित हायड्रोजन निर्मितीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी निश्चितपणे सिद्ध झाला आहे. यामुळे हरित हायड्रोजन हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून प्रस्थापित केला जात आहे. या अद्ययावत हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पातून रोजच्या 8 तासांच्या कार्यकाळात 14 किलो हरित हायड्रोजन निर्माण होण्याची व्यवस्था आहे.

दरम्यान नूतनक्षम ऊर्जा आणि इलेक्ट्रोलायझर्सच्या घसरलेल्या किमतींमुळे, पुढील काही वर्षांमध्ये हरित हायड्रोजनवर आधारित वाहने किफायतशीर बनतील अशी अपेक्षा आहे. हायड्रोजनद्वारे चालणाऱ्या वाहनांच्या क्षेत्रातील भविष्यातील व्याप्ती आणि वेगवान तांत्रिक प्रगतीमुळे हरित हायड्रोजनवर आधारित वाहतुकीची व्यवहार्यता आणखी सुधारण्याची शक्यता आहे. हे विचारात  घेऊन, राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान अंतर्गत  इतर उपक्रमांसह, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय वाहतूक क्षेत्रातील जीवाश्म इंधनांच्या जागी हरित हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जसह प्रायोगिक तत्वावर  प्रकल्प राबवेल. 

तंत्रज्ञानाच्या विकासाला पाठबळ

हे प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि या योजनेंतर्गत नामनिर्देशित योजना अंमलबजावणी संस्थांमार्फत लागू केले जातील. ही योजना इंधन बॅटरी-आधारित प्रणोदन तंत्रज्ञान / अंतर्गत ज्वलन इंजिन-आधारित प्रणोदन तंत्रज्ञानावर आधारित, बसेस, ट्रक आणि 4-चाकी वाहनांमध्ये इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या विकासाला पाठबळ देईल. हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशन्स सारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सहाय्य करणे हा या योजनेसाठी अन्य महत्त्वाचा भाग आहे. हरित  हायड्रोजनवर आधारित मिथेनॉल/इथेनॉल आणि वाहन इंधनामध्ये हरित हायड्रोजनपासून प्राप्त इतर कृत्रिम इंधनांचे मिश्रण यासारख्या वापराला समर्थन पाठबळ देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :शेतीपाणीहिमाचल प्रदेशशेती क्षेत्र