चंद्रपूर : बेभरोशाची शेती म्हणून नेहमीच हिनवले जाते. मात्र मातीची आवड असलेल्या एका डॉक्टरने पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात विविध फळे भाजीपाला (Vegetable Farming), पिकाची लागवड केली. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. डॉ. अमित डांगेवार असे वैद्यकीय क्षेत्रातून शेतात रमणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे.
डॉ. अमित डांगेवार हे जिल्हा सामान्य रुग्णालय (Chandrapur District Hospital) चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र मूळचे ते शेतकरी कुटुंबाचे असल्याने त्यांची नाळ शेतीशी जुळली आहे. वैद्यकीय सेवेतून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या नांदगाव पोडे येथील शेतावर जायचे. यातूनच त्यांनी शेतात फळपिके तसेच भाजीपाल्याची लागवड (Bhajipala Sheti) करण्याचे नियोजन केले.
शेतीचा पूर्वीचा असलेला अनुभवाला प्रगत तंत्रज्ञानाची साथ देत शेतात त्यांनी हापूस, दशेरी, लंगडा, निलम आदी प्रकारची आंब्याची तसेच फणस, चिकू, पेरू व नारळाची लागवड केली. यासोबतच फुलकोबी, शेंगा, वांगे, टमाटर आदी प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे. यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. शेती फुलविण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. ही बाब ओळखून त्यांनी शेतात पाण्याचे योग्य नियोजन केले. त्यामुळे त्यांना फायदा होत आहे.
सेंद्रिय खतांचा केला वापरअलीकडच्या वर्षात सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा भडीमार शेतीत होऊ लागला आहे. खताच्या अधिक माऱ्यामुळे आरोग्यास समस्या उद्भवू शकतात. ही बाब मुळचे डॉक्टर असल्याने डांगेवार यांनी हेरत सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण शेतीत सेंद्रिय खताचा वापर करुन फुलवली आहे.
शेतकरी बांधवांनी केवळ पारंपरिक शेतीच्या भरोशावर न राहत आधुनिक तंत्रज्ञान वापरून इतरही पिके घ्यावी, त्यातून शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो. मला पूर्वीपासून शेतीची आवड असल्याने मी शेतात हा प्रयोग केला आहे. यातून माझा छंदही जोपासला जात असून मला उत्पन्नही मिळते.- डॉ. अमित डांगेवार, वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर