Join us

पीक विम्यासाठी दुसऱ्याचा सातबारा वापरू नका, जळगावच्या शेतकऱ्यांसोबत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:40 IST

Bogus Pik Vima : कृषी विभाग व विमा कंपनीच्या पडताळणीला सामोरे न गेलेले शेतकरी विमा योजनेपासून बाद होण्याची शक्यता आहे.

जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात गेल्या हंगामात एकूण ७२ हजार ६८० शेतकऱ्यांनी ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर पीकविमा काढला होता, मात्र त्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड नसताना पीकविमा काढल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर, जिल्ह्यात ७३३ शेतकरी बोगस आढळून आले आहेत. 

तर दोन हजार ९८९ शेतकऱ्यांनी पडताळणी टाळली असल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात केळी लागवड नसलेले व पीकविमा काढलेले, यासह दुसऱ्याच्या शेतातील सातबारा वापरून पीकविमा काढलेले, कृषी विभाग व विमा कंपनीच्या पडताळणीला सामोरे न गेलेले शेतकरी विमा योजनेपासून बाद होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून हा सर्व अहवाल राज्य कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे, त्यामुळे याबाबत अंतिम अहवालावर कृषी आयुक्तांकडून निर्णय घेण्यात येणार आहे.

पडताळणी न केलेले शेतकरी होणार बाद..?कृषी विभाग व पीकविमा कंपनीकडून जिल्ह्यात केळीच्या क्षेत्राची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान २ हजार ९८९ शेतकऱ्यांनी ही पडताळणी करून घेतली नाही. त्यामुळे आता हे शेतकरीदेखील बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे, तर लागवड क्षेत्रापेक्षा अधिकच्या क्षेत्रावर ज्या १ हजार ११५ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, त्या शेतकऱ्यांना अधिकृत क्षेत्रावरीलच नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे, अधिकच्या क्षेत्रावरील भरपाईची रक्कम त्या शेतकऱ्यांना दिली जाणार नाही.

हेही वाचा : Nafed Kanda Rate : नाफेडकडून कांदा खरेदीचा नवा दर जाहीर, वाचा सविस्तर

शेतात केळी नसताना, केळी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. तो अहवाल आता प्राप्त झालेला आहे. त्यानुसार ७३३ शेतकरी बोगस आढळून आलेले आहेत. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी पडताळणी करून घेतली नाही, अशा शेतकऱ्यांबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेण्यात येणार आहे.- कुर्बान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव 

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रशेतीकृषी योजना