Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेखकडून जमीन मोजून घेताना 'या' चुका टाळा, नाशिकमध्ये पहा काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:15 IST

Agriculture News : वडिलोपार्जित शेती मोजण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय येथे ऑनलाइन अर्ज केला होता.

नाशिक : सातबाराप्रमाणे क्षेत्र मोजून व नकाशे देण्यासाठी २० हजारांची मागणी करत तडजोडअंती १५ हजारांची रक्कम खासगी इसमाद्वारे घेतल्याप्रकरणी कळवणच्या भूमीअभिलेख कार्यालयातील भूकरमापक सागर बापू वानखेडे याच्यासह मुकेश प्रकाश पगार या खासगी इसमास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सदर घटनेत तक्रारदार यांनी त्यांचे वडिलोपार्जित शेती मोजण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, कळवण येथे ऑनलाइन अर्ज केला होता. संबंधितांनी तक्रारदार यांच्या शेताची मोजणी केली व हद्द खुणा ठरवून दिल्या होत्या. त्यानंतर सागर वानखेडे तक्रारदारास मागणी केलेले शेती मोजणी केल्याचे नकाशे व मोजणीचे कागदपत्र देणार होते. 

परंतु वानखेडे यांनी तक्रारदारास कळवणच्या भूमिअभिलेख कार्यालयात बोलावून तुमची मोजलेली जमीन ही कागदोपत्री असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी असून तुमच्या दाखविलेल्या खुणा चुकीच्या आहेत. त्या खुणा परत काढून नवीन खुणा कराव्या लागतील. त्यात तुमचे क्षेत्र कमी होईल, असे सांगितले.

त्यावर वानखेडे यांनी तक्रारदाराकडे सातबाराप्रमाणे क्षेत्र मोजून व नकाशे देण्यासाठी २० हजारांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कळवणच्या भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचला. यावेळी तडजोडअंती खासगी इसम पगार यांना १५ हजारांची लाच घेताना ताब्यात घेतले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik: Land surveyor caught accepting bribe for land measurement.

Web Summary : A land surveyor in Nashik was arrested for accepting a bribe of ₹15,000 through a private individual to provide accurate land measurement maps after initially threatening to reduce the land area on paper. Anti-Corruption Bureau laid the trap.
टॅग्स :शेती क्षेत्रजमीन खरेदीमहसूल विभागशेतकरी