Banana Crop : राज्यातील अनेक भागांत मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका तीव्र झाला असून, या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम शेती पिकांवर दिसून येत आहे. (Banana Crop)
सध्याचे वातावरण रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांसाठी पोषक ठरत असले, तरी केळी पिकावर मात्र थंडीचा जबर फटका बसल्याचे चित्र अर्धापूर, पार्डी आणि सोयगाव परिसरात पाहायला मिळत आहे.(Banana Crop)
गहू-हरभरा जोमात
अर्धापूर तालुक्यात सध्या किमान तापमानात मोठी घट झाली असली, तरी हे वातावरण गहू व हरभऱ्यासाठी अनुकूल ठरत आहे. शेतात ही पिके जोमाने वाढताना दिसत असून, पानांचा रंग, फुटवा आणि वाढ समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे.
केळी पिकावर मात्र थंडीचा घाव
मात्र, याच थंडीचा केळी पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी परिसरात तसेच सोयगाव तालुक्यातील मुढे, शिंदोल, कंकराळा परिसरात केळी बागांमध्ये थंडीचा ताण स्पष्टपणे जाणवत आहे.
अतिथंडीमुळे केळी झाडांची उंची वाढ थांबली असून, पाने पिवळसर पडणे, कडा करपणे, शेंडे सुकणे आणि झाडे कोमेजणे अशी लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. सकाळच्या वेळी पडणारे गार दव आणि सततचे थंड वारे केळीच्या जैविक वाढ प्रक्रियेस अडथळा ठरत आहेत.
तापमान घसरले; वाढ थांबली
केळी पिकासाठी साधारणतः २५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आवश्यक असते. मात्र, यंदा अनेक भागांत तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने झाडांची अन्नप्रक्रिया मंदावली आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर तसेच जून–जुलैमध्ये लागवड केलेल्या केळी बागा सध्या वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच थंडीचा फटका बसल्याने उत्पादन कालावधी लांबण्यासोबतच उत्पादन क्षमता व दर्जा घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
एकरी दीड लाख खर्च; बाग उपटण्याची वेळ
केळी हे अत्यंत खर्चीक पीक मानले जाते. एका रोपासाठी २० ते २२ रुपये खर्च, लागवड, खते, पाणी व्यवस्थापन आणि औषध फवारणी असा मिळून शेतकऱ्यांचा एकरी सुमारे १ लाख ३० हजार रुपयांपर्यंत खर्च झाला आहे.
थंडीपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक व सेंद्रिय खतांचा, तसेच महागड्या औषधांचा वापर केला; मात्र, निसर्गाच्या लहरीपणापुढे सर्व उपाय निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक शेतकरी आता उभ्या बागा काढून टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
खर्च आणि बाजारभावाचा ताळमेळ बसेना
सध्या बाजारात केळीला ७०० ते १ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, तो खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
'एकरी दीड लाखांहून अधिक खर्च करूनही बाग वाचवणे कठीण झाले आहे. वाढ पूर्णपणे थांबली असून झाडांचे शेंडे सुकत आहेत,' अशी व्यथा रवींद्र सोनवणे (सिंदोल) आणि मोतीलाल वाघ (कंकराळा) या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची मागणी
केळी पिकावरील या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता असून, कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन, संरक्षणात्मक उपाययोजना आणि मदत जाहीर करावी, अशी मागणी पुढे येत आहे. अन्यथा लाखो रुपयांचा गुंतवणूक केलेला केळीचा हंगाम पूर्णतः हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
Web Summary : Maharashtra's cold snap benefits wheat and gram but devastates banana crops. Farmers face stunted growth, yellowing leaves, and potential crop failure. High investment costs and low market prices exacerbate the crisis, prompting calls for government assistance.
Web Summary : महाराष्ट्र में ठंड का प्रकोप गेहूं और चने के लिए फायदेमंद है, लेकिन केले की फसल को भारी नुकसान हो रहा है। किसानों को विकास में रुकावट, पीले पत्ते और फसल खराब होने का डर है। उच्च लागत और कम बाजार मूल्य संकट को बढ़ा रहे हैं, सरकार से मदद की मांग की जा रही है।