Join us

Agriculture News : नाशिकमध्ये युरिया घोटाळा, पशुखाद्य कंपनीवर कारवाई, काय आहे प्रकरण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 14:45 IST

Agriculture News : युरियाचा (Urea Fertilizer) औद्योगिकरीत्या वापर करत असल्याचे कृषी विभागाच्या (Agriculture Dep) मोहिमेत उघड झाले आहे.

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील रामशेज येथील एका नामांकित खासगी कंपनीने शेतीसाठी वापरला जाणारा अनुदान पात्र युरिया (Urea Fertilizer) औद्योगिकरीत्या वापर करत असल्याचे कृषी विभागाच्या (Agriculture Dep) मोहिमेत उघड झाले आहे. ९० मेट्रिक टन युरिया खासगी कंपनीच्या घशात जात असून कंपनी व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामशेज येथील गट नंबर ३०५/१३ मध्ये असलेल्या पशुखाद्य बनविणाऱ्या एका खासगी कंपनीची (Case Filed On Company) तपासणी रसायन व खते मंत्रालयाचे अप्पर सचिव चेतराम मीना व जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी यांनी केली. तेथे युरिया खरेदीचे परिपूर्ण दस्तावेज, साठा नोंदवही, खरेदी किंमत, युरिया दैनंदिन वापर नोंदवही, कंपनी प्रशासनाकडून मागूनही मिळत नसल्याने संशय आला. 

त्यानंतर पुन्हा कंपनीमध्ये तपासणी केल्याने ५० किलो बागेतील युरियाची किंमत २४ ते २८ रुपये किलो असल्याचे लक्षात आल्याने औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून शेती वापराचा अनुदानित युरिया असल्याचे निदर्शनास आले. संबंधित कंपनीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेती उपयुक्त युरिया या ठिकाणी वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

ऐवज सीलबंद९० मेट्रिक टन वजनाच्या ५० किलो वजनाच्या १८०० बॅगा किंमत २२ लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज सीलबंद करून दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक सुदर्शन आवारी करीत आहे. 

विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर तसेच जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकात दीपक सोमवंशी मोहीम अधिकारी जिल्हा परिषद व सुनील विटनोर खत निरीक्षक, पंचायत समिती दिंडोरी तसेच तालुका कृषी अधिकारी सावंत व कृषी सहाय्यक श्रीमती बांगर उपस्थित होत्या.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीखतेअन्न