जळगाव : शिंदखेडा शहरातील जाधव नगर येथील कुणाल गणेश पाटील यांच्या शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरची चोरी करण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न जीपीएस यंत्रणेमुळे फसला. चोरट्यांनी सोमवारी पहाटे चोरलेले ट्रॅक्टर (Tractor Theft) स्वतः पाटील यांनी शोधून काढल्याने, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. कुणाल गणेश पाटील यांनी एक महिन्यापूर्वीच नवीन ट्रॅक्टर खरेदी केले होते. या ट्रॅक्टरला मोबाईल क्रमांकाशी जोडणी केलेली जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली होती.
६ जुलै रोजी रात्री हे ट्रॅक्टर घरासमोर उभं असताना अज्ञात चोरट्यांनी ते चोरून नेण्याचा प्रयत्न केला. दि. ७ रोजी पहाटे चार वाजता कुणाल पाटील यांना ट्रॅक्टर जागेवर नसल्याचे लक्षात आले. मात्र ट्रॅक्टरला बसवलेल्या जीपीएस यंत्रणेमुळे ते शोधण्यात मालकाला यश आले. मात्र, ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी ट्रॅक्टर मालक कुणाल गणेश पाटील यांनी केली आहे.
लोकेशनवर धाव घेतलीट्रॅक्टर चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ जीपीएस जोडणी केलेल्या मोबाईलवर ट्रॅक्टरचे लोकेशन तपासले असता, ते वरुळ, घुसरे, चौगाव मार्गे दोंडाईचा येथील सिंधी कॉलनीजवळील स्टार्च फॅक्टरी परिसरात असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ शिंदखेडा पोलीस स्टेशन गाठले. पोलीस कॉन्स्टेबल शेख आणि रुपेश चौधरी यांच्यासोबत कुणाल पाटील यांनी जीपीएस दाखवत असलेल्या लोकेशनवर धाव घेतली. तिथे त्यांना त्यांचे ट्रॅक्टर सुखरूप अवस्थेत आढळून आले.