Join us

Agriculture News : चारशे हेक्टरवर मका पिकाची लागवड, पुनर्वसित गावाने शेतीचा पॅटर्न बदलला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 21:05 IST

Agriculture News : एकेकाळी अविकसित असलेल्या शंकरनगर या पुनर्वसित गावाने शेती व्यवसायातून प्रगतीच्या शिखराला गवसणी घातली आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील येथील शंकरनगर येथे चारशे हेक्टरपेक्षा अधिक हेक्टर शेतजमिनीत मका पिकाची (Maize Sowing) लागवड होत आहे. येथील शेतकरी आपल्या गावासह भोवतालच्या मजुरांना मजुरी उपलब्ध करून देतात. नव्या नव्या व्हरायटीचे बीज लावून अंगमेहनत करून येथे नफ्याची शेती केली जात आहे. शेती व्यवसायाने येथील घरांचे, गावाचे, तसेच सामाजिक व शैक्षणिक चित्र झपाट्याने बदलतांना दिसत आहे. 

उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या स्वप्नाला पूर्णत्वास नेण्यासाठी पहाटे कोवळ्या प्रहरी सात वाजता भाजी भाकरी खाऊन अंगमेहनत, जिद्द चिकाटी, कर्तृत्वाला विश्वासाची जोड या पंचतत्त्वाच्या जोरावर गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) शंकरनगर येथील एक नव्हे तर तब्बल संपूर्णच शेतकऱ्यांनी असाध्य गणल्या गेलेल्या शेती व्यवसायातूच कृषी क्षेत्रात भरारी घेतली आहे. 

एकेकाळी अविकसित असलेल्या शंकरनगर या पुनर्वसित गावाने शेती व्यवसायातून प्रगतीच्या शिखराला गवसणी घातली आहे. खरीप हंगामात मोठ्या लगबगीने मका पिकाची लागवड जोमात सुरू आहे. गावातील महिला मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. जोगीसाखरा परिसरात नव्हे तर संपूर्ण आरमोरी तालुक्यात शेतातून सर्वाधिक उत्पादन घेऊन शेती व्यवसायातून (Farming) आर्थिकदृष्ट्या प्रगत झालेले गाव म्हणून शंकरनगरकडे बघितले जाते. 

धानाला सडेतोड पर्याय म्हणून मका पिकाला अधिक पसंती आहे. एका एकरमध्ये पंधरा ते सोळा क्विंटल धान तर मक्याचे चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल उत्पादन होते. धान पिकापेक्षा मशागत जास्त खर्च फार कमी आहे. उत्पन्न दुप्पट भावदेखील जास्तच त्यामुळे मका व भाजीपाला पिके लावून प्रत्येक शेतात विहीर, बोरवेल, मोटारपंप लावून खरीप आणि रब्बी हंगामात भरभरून उत्पादन घेतले जाते. 

शेतीला जोडव्यवसायावरही भर 

येथील शेतकरी दुसरीकडे भाड्याने शेती करतात लाखोंचे उत्पादन घेतात. परवडत नाही म्हणून शेती सोडणाऱ्यासाठी हे शेतकरी प्रेरणादायी ठरले आहेत. येथे शेती जोड व्यवसाय करताना शेतात तलाव करून मच्छी व्यवसाय, कुक्कुटपालन, शेताच्या बांधावर भाजीपालावर्गीय पिके घेतली जात आहेत. लागवडीपासून ते कीटकनाशक फवारणी ते स्वतः करतात. तांत्रिक पद्धतीने शेती करणे, उच्च प्रतीचे बियाणांचा वापर करून भरघोस उत्पादन घेतले जाते. प्रथमतः काही पीक प्रायोगिक तत्त्वावर घेऊन विश्वासार्हता बघतात.

हेही वाचा : Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजारात कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीगडचिरोलीमकापेरणी