जळगाव : एकीकडे शेतीत हळूहळू बदल जाणवू लागला आहे. जसे की तरुण वर्ग देखील शेती व्यवसायात उतरू लागला आहे. मात्र दुसरीकडे पिढ्यानपिढ्या होणाऱ्या जमिनीच्या विभागणीमुळे एकेकाळी जमीनदार म्हणून ओळखले जाणारे मोठे शेतकरी आता अल्पभूधारक झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) ८० टक्क्यांहून अधिक शेतकरी आजही पारंपरिक शेतीवरच अवलंबून असल्याने, कुटुंबांची संख्या वाढत गेली, पण शेतीचे क्षेत्र वाढले नाही. त्यामुळे काही दशकांपूर्वी ज्यांच्याकडे शेतीचा मोठा लवाजमा होता, त्यांच्याकडील जमिनी आता गुंठ्यांवर आल्या आहेत.
या स्थितीमुळे अनेक कुटुंबांचे पोट भरणेही आता कठीण झाले आहे. भविष्यातही हीच परिस्थिती कायम राहिल्यास आजचे मोठे जमीनदारही अल्पभूधारक होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतीसोबतच जोडव्यवसाय किंवा शेतीपूरक व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकरी कुटुंबांना नवीन संधी मिळू शकतील.
अल्पभूधारक शेतकऱ्यांनी यापुढे काय करावे?अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीतून पुरेसे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे त्यांनी शेती करत असताना, शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. जेणेकरून, संबंधित शेतकऱ्याला इतर मार्ग देखील उपलब्ध होऊ शकतात. तसेच पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा नवीन प्रयोग केल्यास शेतकऱ्याला शेती देखील परवडू शकते. मात्र, कमी शेती आहे म्हणून अनेक शेतकरी आहे ती शेती देखील करत नाहीत.
अत्यल्प, अल्पभूधारक म्हणजे काय ?
- अत्यल्प भूधारक : १ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी
- अल्पभूधारक : १ हेक्टरपेक्षा जास्त आणि २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी
- अर्ध मध्यम भूधारक : २ ते ४ हेक्टर क्षेत्र असलेले शेतकरी
- मध्यम भूधारक : ४ ते १० हेक्टर दरम्यान क्षेत्र असलेले शेतकरी
- जमीनदार : १० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेले शेतकरी
असलेली शेतीही बटाई व उक्त्याने देण्यावर भरजिल्ह्यातील प्रत्येक गावात अनेक शेतकरी आपली स्वतःची शेती न करता, ती शेती बटाई व उक्त्त्याने देत आहेत. काही भागांमध्ये उक्त्याने शेती करण्याचे दर हे १५ हजार रुपये बिघ्याप्रमाणे आहेत, तर ठिकाणी हे दर ७ ते ८ हजार रुपये बिघ्याप्रमाणे आहेत. हे दर शेतात पाणी असेल त्यावर ठरत असतात. अनेकांना शेतीमध्ये रस नसल्याने किंवा शेती परवडत नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.