Join us

Agriculture News : भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 वाणांचे लोकार्पण, पीएम मोदी उपस्थित राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 17:34 IST

Agriculture News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी या 109 वाणांचे लोकार्पण केले जाणार आहे.

Agriculture News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि  जैव-संवर्धनयुक्त 109 वाणांचे लोकार्पण केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली होती.  केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला. त्यावेळी बागायती पिकांच्या हवामानास अनुकूल असणारे ३२ पिके आणि फळांच्या १०९ नवीन उच्च-उत्पादकता असणारे वाण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी या 109 वाणांचे लोकार्पण केले जाणार आहे. ज्यामध्ये 34 शेतीची पिके आणि 27 बागायती पिकांचा समावेश असेल. 

दरम्यान शेतीच्या पिकांमध्ये भरड धान्ये, गवत वर्गातील पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, तंतुमय पिके, चांगले उत्पादन देणाऱ्या इतर पिकांसह विविध तृणधान्यांच्या बियाण्याचे पंतप्रधान यावेळी लोकार्पण करतील. बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाज्या, लागवडीची पिके, कंद वर्गातील पिके, मसाले, फुले आणि औषधी वनस्पतींचे लोकार्पण केले जाईल. शाश्वत शेती आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

पिकांच्या लागवाडीला प्रोत्साहन 

भारताला कुपोषण मुक्त करण्यासाठी, पंतप्रधानांनी पिकांच्या जैवसंवर्धनयुक्त प्रजातींना सरकारच्या माध्यान्ह भोजन, अंगणवाडी यांसारख्या अनेक कार्यक्रमांशी जोडून या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि त्यांच्यासाठी उद्योजकतेचे नवीन मार्ग खुले होतील, यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या 109 वाणांचे लोकार्पण म्हणजे, त्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनरेंद्र मोदीपीक