जळगाव : युरियासह अन्य खतांचा जिल्ह्यात तुटवडा नाही. मात्र काही व्यापारी कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आधारकार्डच्या माध्यमातून होणारा हा काळाबाजार कासोदा (एरंडोल) येथील कारवाईतून उघड झाला आहे. त्यामुळे या विक्रेत्याविरोधात गंभीर कारवाईचा प्रस्ताव शुक्रवार दि.२० रोजी दाखल केला जाणार आहे.
कासोदासह परिसरातील शेतकऱ्यांनी युरियासह अन्य खतांची मागणी केल्यानंतर तुटवटा भासवून लूट होत असल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाथ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विकास बोरसे, तालुका नियंत्रण निखील टोळकर यांनी कासोद्यातील विक्रेत्याकडे अचानक तपासणी केली. या विक्रेत्याकडे असणाऱ्या खतांच्या साठ्यात तफावत आढळून आली. त्यामुळे पथकाने तातडीने पंचनामा सुरु केला आणि कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरु केली आहे.
...अन् प्रकार झाला उघडदरम्यान, कासोद्यात बुधवारी दिवसभर प्रवीण हार्डवेअर व कृषी केंद्र, आबासाहेब खंडेराव फुटसेल सोसायटी, साई कृषी केंद्र, सुदर्शन कृषी केंद्र, गणेश पुंडलिक वाणी कृषी केंद्र, जाजू केंद्र या दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान, एका शेतकऱ्याने आधारकार्ड सादर करून युरियाच्या दोन गोण्या खरेदी केल्या.
ही खरेदी प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या पथकाने तातडीने शेतकऱ्याने घेतलेला युरिया आणि ऑनलाईन प्रक्रियेत असलेल्या नोंदीची पडताळणी केली. त्यात १६ गोण्यांची तफावत दिसून आली आहे. शेतकऱ्याने दोन गोण्या घेतल्यानंतर त्याच्या आधारकार्डाच्या आधारे १८ गोण्या खरेदी केल्याची नोंद ऑनलाईन नोंदीत घेण्यात आली आहे.
शेतकऱ्याच्या आधारकार्डाच्या आधारावर खरेदीदाराला अंधारात ठेऊन 'पॉस' प्रणालीत १८ गोण्यांची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने दर्शविण्यात आलेल्या अन्य १६ गोण्यांचा काळाबाजार करण्याचा घाट या विक्रेत्याने रचल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून या पथकाने संबंधित शेतकऱ्याचाही जबाब नोंदविला आहे.
विक्री बंदचे आदेशदरम्यान, तफावत आढळलेल्या युरियाची विक्रीवर या पथकाने बंदी घातली आहे. तसेच काही मुदतबाह्य खताचीही पडताळणी केली जात असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. या विक्रेत्याकडे असणाऱ्या बियाण्यांच्या साठ्याचाही नोंद घेतली असून त्यात मुदतबाह्यसह अन्य मार्गाने बियाणे बाजारात आणण्याचा प्रकार केला जातो का. याची पडताळणी केली जाणार आहे.
खरेदीवेळी शेतकऱ्यांना आधारकार्ड सादर करणे बंधनकारक आहे. मात्र शेतकऱ्यांनी खरेदी केलेले खत आणि ऑनलाईन प्रक्रियेत विक्रेत्याने केलेली नोंद याकडेही बारकाईने लक्ष ठेवल्यास गैरप्रकाराला आळा बसू शकणार आहे.- पद्मनाथ म्हस्के, जिल्हा कृषी विकास अधिकारी
Web Summary : Jalgaon farmers are being cheated via Aadhaar-enabled urea black marketing. Retailers record inflated purchases, exploiting farmers and diverting subsidized fertilizer. Investigation underway.
Web Summary : जलगाँव में आधार से जुड़ी यूरिया की कालाबाजारी से किसानों को धोखा दिया जा रहा है। खुदरा विक्रेता बढ़ी हुई खरीद दर्ज करते हैं, किसानों का शोषण करते हैं।