Agriculture News : धाराशिव येथील वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील एका पोल्ट्री शेडमध्ये कृषी विभागाच्या (Agriculture Department) भरारी पथकाने छापा मारून २० टन रासायनिक खताचा अवैध साठा जप्त केला आहे. (Fertilizer)
ऐन खरिपाच्या तोंडावर वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये कृषी विभागाच्या (Agriculture Department) भरारी पथकास रासायनिक खताचा (Fertilizer) २० टन अवैध साठा आढळून आला आहे. त्याची किंमत ४ लाख ६१ हजार रुपये असून, दोघांवर वाशी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
छाप्याची माहिती आणि कारवाई
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांना पिंपळगाव येथे मोठ्या प्रमाणावर अवैध खत साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भरारी पथकासह कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, मोहीम अधिकारी दीपक गरगडे, गुण नियंत्रक प्रवीण पाटील, तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे आणि पंचायत समितीचे गुण नियंत्रक अविनाश माळी यांनी संयुक्त कारवाई केली.
४५६ पोत्यांचा साठा; परवाना नसलेले खत
शेतकरी दत्तात्रय लिंबराज तावरे यांच्या शेतातील पोल्ट्री शेडमध्ये छापा टाकल्यावर ४५६ पोते रासायनिक खत आढळून आले. तपासणीत हे खत कोणत्याही परवान्याशिवाय साठवलेले असल्याचे स्पष्ट झाले. खताचे तीन वेगवेगळ्या प्रकारांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलिसात गुन्हा नोंद
प्राथमिक चौकशीत तावरे यांनी सदर खत खामकरवाडी येथील त्यांच्या नातेवाईक विकास होळे यांच्याकडून आणल्याचे सांगितले. कृषी अधिकाऱ्यांनी विकास होळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण दवाखान्यात असल्याचे सांगितले. मात्र, पावत्या मागितल्या असता उद्या आणतो, असे उत्तर दिले. स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
खतांची गुणवत्ता तपासणी सुरू
सदर खतांचा प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यावर त्याची गुणवत्ता स्पष्ट होणार आहे. बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे खत असल्याचे आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, खते, बियाणे किंवा अन्य कृषी निविष्ठा खरेदी करताना पावती घ्यावी. कोणत्याही प्रकारचा संशयास्पद साठा, बोगस माल किंवा फसवणूक आढळल्यास तात्काळ तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालय अथवा पंचायत समितीच्या कृषी विभागात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.