जळगाव : संत मुक्ताई यांच्या (Sant Muktai Palkhi) आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे ६ जून रोजी मुक्ताईनगर येथून प्रस्थान होणार आहे. तब्बल २८ दिवसांचा ६०० किमी एवढा पायी प्रवास करून हा सोहळा ३ जुलै रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे. यंदा दिंडीचे ३१६ वे वर्ष आहे.
आषाढी पालखी सोहळ्यासाठी संत मुक्ताईच्या चांदीच्या पादुका या पंढरपूर (Pandharpur) येथे जात असतात. शुक्रवार ६ जून रोजी दुपारी ३ वाजता दिंडी प्रस्थान करणार आहे. नवीन मुक्ताई मंदिरात पालखीचा पहिला मुक्काम असेल आणि त्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
पालखी सोहळ्याच्या रथाला ओढण्यासाठी राजेश पाटील, नाचणखेडा यांची बैलजोडी असेल, तर सोहळ्यासोबत दोन अश्व देखील असणार आहे. ते अश्व संदीप रामचंद्र भुसे, मरकळ, ता. खेड, जि, पुणे यांचे असतील.
इथे असेल पालखीचा मुक्काममराठा मंगल कार्यालय मलकापूर, मोताळा, बुलढाणा, येळगाव, चिखली भरोसा फाटा, देऊळगाव मही, देऊळगाव राजा, कन्हैयानगर जालना, काजळा फाटा, अंबड, वडीगोद्री, गेवराई, पाडळसिंगी, नामलगाव फाटा, बीड माळवेस हनुमान मंदिर, बीड बालाजी मंदिर, पाली, वानगाव फाटा, पारगाव, वाकवड, भूम, जवळा, शेंद्री, माढा, आष्टी, पंढरपूर. मार्गे दिंडी पंढरपूरला पोहोचेल.
खानापूर येथील दिंडीचेही ६ जूनलाच प्रस्थानफैजपूर : यावल व रावेर तालुक्यातील डिगंबर महाराज चिनावलकर आषाढी पायी दिंडीचेही ६ जून रोजीच खानापूर येथून प्रस्थान होणार असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. खानापूर येथून खिरोदा, हंबर्डीमार्गे भुसावळ, जामनेर, सिल्लोड, भोकरदन, जालना बीड बार्शी मार्गे २३ दिवसांत ५०० किमी प्रवास करून दिंडी पंढरपूर येथे पोहोचेल.