Join us
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षपंढरीत बेदाणा उद्योगाला घरघर; उत्पादनात 60 टक्के घट, गंधक आणि द्राक्षांचे दर कसे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 19:04 IST

Bedana Production : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांसह बेदाणा उत्पादनाचे गणितही पूर्णपणे कोलमडले आहे.

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांसह बेदाणा उत्पादनाचे गणितही पूर्णपणे कोलमडले आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनाला मोठा तडाखा बसला असून परिणामी यंदा बेदाणा उत्पादनात तब्बल ६० टक्क्यांची मोठी घट झाली आहे. 

निफाडमध्ये दरवर्षी साडेतीन हजार बेदाणा निर्मिती शेड्स गजबजलेले असायचे, तिथे यंदा केवळ एक हजार शेड्स उभे राहिले असून, उरलेले दोन हजारहून अधिक शेइस ओस पडले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लाखो रुपयांची उलाढाल थंडावली असून रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, कसबे सुकेणे, साकोरे, उगाव, पालखेड, शिवडी, वनसगाव, विंचूर हा पट्टा बेदाणा निर्मितीचे मुख्य केंद्र मानला जातो. 

मात्र गेल्या हंगामात सुमारे नऊ महिन्यांहून अधिक काळ पावसाने मुक्काम ठोकल्यामुळे द्राक्ष उत्पादनात ५५ टक्क्यांनी मोठी घट झाली. द्राक्षाचा मणीच पुरेसा उपलब्ध नसल्याने "कच्च्या माला" अभावी बेदाणा उद्योगाचे चाक चिखलात रुतले आहे. पिवळा आणि काळा अशा दोन्ही बेदाणा प्रक्रियेला मंदीची झळ सोसावी लागत आहे.

गंधक महागला; द्राक्षांचे दर कडाडलेलेगंधकाचे दर : बेदाणा प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेल्या ५० किलो गंधकाच्या गोणीचे दर १२०० रुपयांवरून थेट ३२०० रुपयांवर पोहोचले आहेत.द्राक्ष मण्यांचे दर : स्थानिक द्राक्ष मणी ३० ते ३२ रुपये, निर्यातक्षम द्राक्षमणी ४५ ते ५१ रुपये प्रति किलोने मिळत आहेत. वाढता खर्च आणि अपुरा कच्चा माल यामुळे अनेक व्यावसायिकांनी यंदा आपले शेड्स बंद ठेवणेच पसंत केले आहे.

यंदा द्राक्ष उत्पादन केवळ ५५ टक्केच उरले आहे. एकरी उत्पादन अवघे १५ ते २० क्विंटल निघत असल्याने बेदाणा निर्मितीसाठी द्राक्षच शिल्लक राहिली नाहीत. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली आहे.- भूषण धनवटे, बेदाणा उत्पादक, दात्याने

कसबे सुकेणे परिसरात यंदा अवघे ४० टक्के शेड्स सुरू आहेत. गंधकाचे भाव दुप्पट झाले असून महागडे द्राक्षमणी खरेदी करून बेदाणा तयार करणे परवडत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव यंदा निर्मिती बंद ठेवली आहे.- वसीम शकील पिंजारी, बेदाणा उत्पादक 

English
हिंदी सारांश
Web Title : Grape production decline hits raisin industry in Nashik; prices soar.

Web Summary : Nashik's raisin industry faces crisis due to a 60% production drop after heavy rains damaged grape crops. High sulfur and grape prices further strain producers, forcing many to halt operations.
टॅग्स :द्राक्षेशेतीशेती क्षेत्रशेतकरी