Join us

पोटहिश्श्याच्या मोजणीचे नियम धाब्यावर; 'त्या' वहिवाट मोजणीचे नकाशे होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:05 IST

Jamin Mojani Nakasha पोटहिश्श्याच्या मोजणीसाठी जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांना धाब्यावर बसवून हद्द कायम करून देण्यासाठी वहिवाटीच्या मोजणीचे नकाशे तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : पोटहिश्श्याच्या मोजणीसाठी जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांना धाब्यावर बसवून हद्द कायम करून देण्यासाठी वहिवाटीच्या मोजणीचे नकाशे तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हे नकाशे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक प्रभाकर मुसळे यांनी दिला आहे.

याबाबत सर्व तालुका कार्यालयांकडून माहिती मागविली असून, या रद्द करण्यात आलेल्या नकाशांबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनाही कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी २८ फेब्रुवारीच्या परिपत्रकानुसार, जमिनीच्या पोटहिश्श्याची मोजणी करण्याची प्रक्रिया निश्चित केली होती.

ही मोजणी करताना सर्व सहधारकांची संमती तसेच महापालिका, नगरपालिका किंवा संबंधित विकास प्राधिकरणाने दिलेल्या तात्पुरत्या ले आउटच्या (आरेखन) मान्यतेचे पत्र असावे, असे बंधन घालण्यात आले आहे.

परंतु या परिपत्रकाचे उल्लंघन करून जिल्ह्यातील काही नगर भूमापन अधिकारी आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून हे नकाशे वितरित केल्याचे निदर्शनास आले आहे.

नियमांचे उल्लंघन करून वहिवाटीच्या मोजणीचे नकाशे दिल्याच्या तक्रारी नागरिकांकडून जिल्हा कार्यालयाकडे आल्या आहेत. नकाशे देताना काही अधिकाऱ्यांनी हद्द कायम मोजणीच्या अर्जाचा वापर करून अंतर्गत वहिवाटीचे नकाशे वितरित केले आहेत.

हे परिपत्रकातील आदेशांचे स्पष्ट उल्लंघन असून हे नकाशे रद्द करावेत, असे मुसळे यांनी आदेशात म्हटले आहे.

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, नगर रचना विभाग, पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ यांसारख्या संबंधित कार्यालयात बांधकाम परवानगी अथवा अन्य कोणत्याही कामासाठी या वहिवाटीच्या नकाशांचा वापर केला जातो.

रद्द केलेल्या नकाशांची माहिती विहित नमुन्यात १८ ऑगस्टपर्यंत जिल्हा कार्यालयाला सादर करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

अधिक वाचा: शेतकऱ्यांनो आता करा 'एआय' आधारित उसाची शेती; 'ही' बँक देतेय अनुदान

टॅग्स :महसूल विभागसरकारराज्य सरकारपुणेजिल्हाधिकारीआयुक्त