Join us

आला रे आला कोकणचा हापूस बाजारात आला! यंदा कसे राहतील हापूससह आंब्याचे बाजारभाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 18:01 IST

सध्या पुणे बाजारात रत्नागिरी, कर्नाटकी, देवगड हापूस आंब्याची आवक होत आहे.

पुणे :  उन्हाळा म्हटलं की सर्वांना आंब्याची आठवण येते. आंबा हा आपल्या सर्वांच्याच आवडीचं फळ आहे. यंदाचा आंब्याचा हंगाम सुरू झाला असून पहिल्या टप्प्यातील आंबाबाजारात आला आहे. पुणे बाजार समितीमध्ये देवगड, रत्नागिरी आणि कर्नाटकी हापूस आंब्याची आवक झाली आहे. त्यामध्ये कर्नाटकी आंब्याला कमी तर रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचा दर जास्त आहे. 

दरम्यान, दरवर्षी १५ मार्चला आंब्याचा हंगाम सुरू होत असतो पण यंदा एक महिना आधी म्हणजे १५ फेब्रुवारीला आंब्याची आवक सुरू झाली. तर पुणे बाजार समितीमध्ये मागच्या एका महिन्यापासून थोड्या प्रमाणावर हापूस आंब्याची आवक सुरू झाली होती. मागच्या महिन्यात आंब्याची आवक जास्त होती तर मार्चच्या सुरूवातीच्या आठवड्यामध्ये आंब्याची आवक कमी असल्याचं येथील आडतदारांनी सांगितलं.

पुणे बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची ७ डझनची पेटी व्यापाऱ्यांकडून ६ ते साडे सहा हजार रूपयांना विक्री केली जात आहे. त्याचबरोबर रत्नागिरी हापूस आंबा प्रतिपेटी ३ हजारांपासूनही विक्री केला जातो. प्रतवारीनुसार त्याचा दर निश्चित केला जातो असंही आडतदारांनी सांगितलं. दरम्यान, चांगल्या प्रतीची रत्नागिरी हापूस आंब्याची साडेतीन डझनाची पेटी ४ हजार ५०० रूपयांना विक्री केली जात आहे. देवगड हापूस आंब्याच्या ६ डझनच्या एका पेटीला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडे ६ हजार रूपयांचा दर आहे. 

कर्नाटकी आंबा कमी दरातकर्नाटकी आंब्याची आवक मागच्या एका आठवड्यापासून सुरू झाली असून दोन डझनच्या एका पेटीला पुणे बाजार समितीमध्ये  ८०० रूपये ते १ हजार रूपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. तर अनेकदा कर्नाटकी हापूस आणि देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंबा ग्राहकांना ओळखता येत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असते.

यंदा आंब्याला जास्त मोहोर आला होता पण त्यातील ६० टक्के मोहोर रोगामुळे खराब झाला. मध्येच पडलेला पाऊस आणि थ्रीप्समुळे बराच मोहोर गळाला. यावर विद्यापीठे किंवा कृषी विभागाकडून कोणताच रिसर्च झाला नाही. त्याचबरोबर मजुरी, खते, औषधांचा खर्च वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर संकट आहेच. पण यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांचा आंबा चांगल्या क्वालिटीचा आहे. - राजू पावसकर (आंबा उत्पादक शेतकरी, धाऊलवल्ली, ता. रजापूर, जि. रत्नागिरी)

दरवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन वाढले असून येणाऱ्या काळात हवामानात बदल, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीने अडथळा आणला नाही तर मोठ्या प्रमाणावर आवक आंब्याची राहील. असं झालं तर दर स्थिर असतील किंवा कमी होतील पण यंदा आंब्याचे दर जास्त वाढण्याची शक्यता सध्या तरी नाही.- बलराज भोसले (आंब्याचे व्यापारी, पुणे बाजार समिती)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीआंबाबाजार