Join us

कोल्हापुरकरांनो आता घ्या हापूसचा आनंद! १९ मे पासून भरणार पणनचा आंबा महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 20:30 IST

पणन मंडळाडून या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर :  पणन मंडळाकडून यंदा विविध ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला असून आता कोल्हापुररांनासुद्धा हापूसचा आनंद घेता येणार आहे. पणन मंडळाकडून कोल्हापूरमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील नागरिकांना थेट शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करता येणार आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजना अंतर्गत विविध फळ महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर मार्फत दि. 19 ते 23 मे 2024 या कालावधीमध्ये ‘कोल्हापूर आंबा महोत्सव 2024’ चे ‘भारत हौसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर’ येथे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर आंबा महोत्सवाचे उद्धघाटन रविवार  दि. 19 मे रोजी सकाळी 11. 00 वा. मा. श्री. अमोल येडगे सो. (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे.

महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी केसर व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये आंबा उत्पादक याना 30 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना भौगोलिक मानांकन प्राप्त कोकणातील अस्सल हापूस आंबा उत्पादकांकडून आंबा उपलब्ध होणार आहे.  

सदर आंबा महोत्सव मध्ये ग्राहकांना आंब्याच्या  विविध  जाती  माहीत होण्यासाठी  राज्यातील आंब्याचे प्रदर्शन ठेवणार आहोत. महोत्सवाचे वेळ सकाळी 9 ते रात्री 9 असणार आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमास करवीरवासियांनी उपस्थित राहुन आंबा महोत्सवास भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीआंबा