Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kharif Season: खरीप पेरणीचे 'इतके' हेक्टरवर क्षेत्र प्रस्तावित! वाचा 'या' जिल्ह्याचे खरीप नियोजन सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:55 IST

Kharif Season : यंदाचा पावसाळा सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्हा पेरणीचे नियोजन, त्यासाठी लागणारे बियाणे आणि खतसाठ्याच्या मागणीचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. वाचा सविस्तर

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत बुलढाणा जिल्ह्याकडून करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ७ लाख ५१ हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

खरीप हंगामासाठी १ लाख २४ हजार ८१३ क्विंटल बियाणे लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली. यंदाचा पावसाळा सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. 

या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील पेरणीचे नियोजन, त्यासाठी लागणारे बियाणे आणि खतसाठ्याच्या मागणीचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले असून, या नियोजनाचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात ७ लाख ५१ हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. दरम्यान, खते आणि बियाण्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.

पेरणीसाठी असे आहे बियाण्याचे नियोजन!

जिल्ह्यातील खरीप पेरणीसाठी एकूण १ लाख २४ हजार ८१३ क्विंटल बियाणे लागणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनचे महाबीजमार्फत १८ हजार ५९२, एन. एस. सी. ५ हजार आणि इतर कंपन्यांमार्फत ८७ हजार ९०५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

१,८५,४८७ मेट्रिक टन खतसाठा मंजूर!

* जिल्ह्यासाठी येत्या खरीप हंगामात १ लाख ८५ हजार ४८७ मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा कृषी आयुक्तालयामार्फत मंजूर करण्यात आला आहे.

* युरिया, डीएपी, संयुक्त खते आदी खतांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अनगाईत यांनी दिली.

२०२४ मध्ये ७ लाख ३७हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती पेरणी

* जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीच्या प्रस्तावित नियोजनात एकूण ७ लाख ५१ हजार ३५७ हेक्टर खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात सर्वाधिक सोयाबीन व कपाशीचा पेरा प्रस्तावित करण्यात आला. २०२४ मध्ये जिल्ह्यात ७लाख ३७ हजार ४१४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

जिल्ह्यात येत्या खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली असून, नियोजन सुरू केले आहे. नियोजनानुसार पेरणीसाठी सोयाबीन, कपाशी आदी पिकांच्या वाणांचे १ लाख २४ हजार ८१३ क्विंटल बियाणे लागणार आहे.  - पी. ई. अनगाईत, कृषी विकास अधिकारी, बुलढाणा

हे ही वाचा सविस्तर : Onion Export : लासूर स्टेशनचा ९०० क्विंटल कांदा दुबई, श्रीलंकेला रवाना; असा मिळाला दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रखरीपशेतकरीशेतीबुलडाणा