Join us

Kartiki Ekadashi 2024 : कार्तिकी यात्रेनिमित्त शेतकरी वारकऱ्यांचे दैवत विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 10:34 IST

दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून 'श्रीं'चा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

पंढरपूर : दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून 'श्रीं'चा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

यावर्षी दि. ४ नोव्हेंबरला चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून सकाळी साडेसात वाजता श्रींचा पलंग काढण्यात आला. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला.

त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

'श्रीं'चा पलंग काढल्यानंतर काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. २० नोव्हेंबर (प्रक्षाळ पूजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध राहील.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस महानैवेद्य समर्पित करण्यासाठी ७ हजार रुपये देणगी देऊन महानैवेद्य सहभाग योजनेत सहभागी होता येणार आहे. त्याची दि. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील नोंदणीही सुरू केली आहे.

त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०८१८६-२२४४६६ व २२३५५० या क्रमांकावर व श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथील देणगी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :पंढरपूरपंढरपूर वारीशेतकरीअध्यात्मिक