वसंत भोईर
रब्बी हंगामात अधिकाधिक उत्पन्नासाठी वाडा तालुक्यातील शेतकरी विविध रब्बी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रयोग करीत आहेत. यावर्षी पालघर जिल्ह्याच्या तालुक्यातील गोन्हे विभागातील ५० हून अधिक शेतकऱ्यांनी ताग पिकाची पेरणी केली आहे. त्यामुळे सध्या वाड्यात तागाची शेती चांगलीच बहरली आहे.
वाडा तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात कलिंगड, टरबूज, फुलशेती या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करुन चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र ही पिके अधिक खर्चिक असल्याने कमी खर्चात व कुठल्याही प्रकारच्या खतांची तसेच पाण्याची आवश्यकता नसलेल्या हरभरा, वाल, मूग, तिळ, तूर ही नगदी पिकेही घेत आहेत.
यावर्षी येथील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी खर्च व अधिक उत्पादन देणारे ताग या पिकाची त्यात भर घातली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड या तालुक्यांतील शेतकऱ्यांबरोबर वाडा तालुक्यातील गोन्हे विभागातील साई देवळी, मांडे, भोपिवली, खरिवली, वावेघर आदी दहा ते बारा गावांतील ५० हून अधिक शेतकऱ्यांनी दीडशे एकर क्षेत्रावर ताग पिकाची पेरणी केली आहे. सध्या हे पीक फुलोऱ्यात आले असून पिवळ्याधमक फुलांनी शेतात सोने उगवल्यासारखे भासते आहे.
तागाच्या बी पासून तेल तयार केले जाते. या बी साठी गुजरातमधून मोठी मागणी असून या राज्यातील व्यापारी खरेदीसाठी या भागात येत असतात. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तागाचे बियाणे पुरवले जाते.
कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक
ताग पिकाचे बियाणे १०० ते १२५ प्रतिकिलो दराने उपलब्ध होते. वाल, मूग या पिकांप्रमाणे या बियाणाची पेरणी केली जाते. पेरणीपूर्वी अथवा पेरणीनंतर कुठल्याही प्रकारच्या खताची तसेच पाण्याचीही आवश्यकता लागत नाही. साडेतीन महिन्यात हे पीक पूर्ण तयार होऊन काढणीस तयार होते.
१० क्विंटल एकरी उत्पादन
ताग शेतीतून प्रतिएकर ९ ते १० क्विंटल उत्पादन (बी) मिळते. या बियांना सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल दर मिळतोय. कमी खर्चाचे व प्रतिएकरी ६५ हजार हमखास उत्पादन देणारे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
गतवर्षी केलेल्या ताग शेतीच्या प्रयोगात कमी खर्चात चांगले उत्पादन व उत्पन्न मिळाल्याने यावर्षीच्या रब्बी हंगामात चार एकरमध्ये तागाची पेरणी केली आहे. - जनार्दन पाटील, शेतकरी, साई देवळी, ता. वाडा.