Join us

पिकांच्या रक्षणासाठी झटका मशीनचा जुगाड, असं काम करतं मशीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 13:00 IST

वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी ‘झटका मशीन’ या यंत्राचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा भर वाढत आहे.

अलीकडे अनेकदा शेतात वन्यप्राण्यांचा उपद्रव शेतकऱ्यांना नाकीनऊ आणत असतो. यातून अनेकदा पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यावर नियंत्रणासाठी रब्बी हंगामात ‘झटका मशीन’ या यंत्राचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा भर वाढत आहे. या माध्यमातून, वन्यप्राणी दुरून डोलणारे पीक पाहत राहील. पण पिकांना त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान पोहोचत नाही.

अलीकडे वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करणे जिकिरीचे झाले आहे. पूर्वी याच कामासाठी शेतात मचाण (मारा) तयार करून पिकांवर नजर ठेवली जात. वन्यप्राणी किंवा पक्ष्यांचे थवे पिकात आढळून आल्यास गोफणीच्या मदतीने दगड भिरकावून त्यांना पिटाळून लावले जायचे. काही शेतकरी शेतात बुजगावणे लावण्याला प्राधान्य द्यायचे. वन्यप्राणी व पक्ष्यांना या सर्व बाबी अंगवळणी पडल्याने कालांतराने त्या निष्प्रभ ठरू लागल्या. पुढे काही शेतकऱ्यांनी शेतात कुत्र्याच्या आवाजाचे रेकॉर्डिंग वाजविणे, हलणाऱ्या काचेच्या बाटल्या लावणे, कॅसेटमधील टेप अथवा चमकणाऱ्या पट्ट्या लावणे, साड्यांचे कुंपण तयार करणे असेही अभिनव प्रयोग केल्याचे आपण पाहिले आहे.  

दरम्यान ‘झटका मशीन’ पारंपरिक विजेसह सौर ऊर्जेवर चार्ज करण्यायोग्य आहे. त्याला पॉवर बॅटरी जोडलेली असते. मशिनच्या मागून दोन तारा बाहेर येतात, ज्या शेताच्या आजूबाजूला तारेला जोडलेल्या असतात. एका मशिनने सुमारे २० ते ४० एकर पिकाचे संरक्षण करता येते. या यंत्रामुळे वन्यप्राण्यांना इजा न होता पीक सुरक्षित ठेवता येते. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामातील पिकांवर वन्यप्राण्यांचा ताव अधिक असतो. ही बाब लक्षात घेत शेतकरी ‘झटका मशीन’च्या वापरावर भर देत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

'झटका मशीन' कसं काम करतं?

शेताला असलेल्या तारांच्या कुंपणाला एक विशिष्ट उपकरण लावले जाते. ते उपकरण सौरऊर्जेवर सौरऊर्जेवर कार्य करते. सोलर पॅनेलद्वारे त्या उपकरणाची बॅटरी चार्ज केली जाते. अंधार व्हायला सुरुवात होताच त्यातील वीजप्रवाह आपोआप सक्रिय होतो. त्या तारांना वन्यप्राण्यांचा चुकून स्पर्श झाल्यास त्यांना धक्का बसतो. त्यामुळे त्यांना भोवळ येत येते, मात्र त्यांच्या जीवितास धोका उद्भवत नाही. त्याचवेळी मशिनचा सायरन वाजतो आणि वीजपुरवठा खंडित होतो. त्यानंतर काही काळाने वीजपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे काही वन्यप्राणी तिथून पळून जातात. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीशेतकरीपीक