Join us

Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची यंत्रणा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:29 IST

शेतजमीन आणि प्लॉट मोजणीच्या नवीन शुल्क आकारणीची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. नव्या आदेशानुसार मोजणीचे तीन सुविधांऐवजी दोनच प्रकार करण्यात आले आहे.

कोल्हापूर : शेतजमीन आणि प्लॉट मोजणीच्या नवीन शुल्क आकारणीची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. नव्या आदेशानुसार मोजणीचे तीन सुविधांऐवजी दोनच प्रकार करण्यात आले आहे.

पण ऑनलाइन अर्ज करण्यास गेल्यानंतर सर्व्हर अपडेट झालेले नाही, बंद आहे, ऑनलाइन सिस्टममध्ये बदल केलेले नाहीत, अशी कारणे सांगून मोजणीचे ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

मोजणीसाठीचे अर्ज दाखल करण्याची यंत्रणा विस्कळीत झाली आहे. यासंबंधी भूमी अभिलेखचे प्रशासन येत्या सोमवारपर्यंत सर्व सुरळीत होईल, असे सांगत आहे.

साधी, तातडीची, अतितातडीची असे मोजणीत तीन प्रकार होते.  मात्र, नव्या आदेशानुसार तीन सुविधांऐवजी साधी आणि जलदगतीची मोजणी असे दोनच प्रकार करण्यात आले आहे.

मोजणीचे दरही दुपटीहून अधिक केले आहे. यानुसारची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या.

पण विधानसभा निवडणुकीत वाढीव दराने मोजणीचे शुल्क घेतल्यास शेतकऱ्यांत नाराजी निर्माण होईल, त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसेल म्हणून याच्या अंमलबजावणीस प्रशासकीय कारण पुढे करून स्थगिती दिली.

मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्याने १ डिसेंबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त निरंजनकुमार सुधांशू यांनी जिल्हा भूमी अभिलेख विभागास दिले आहे.

नवी शुल्क आकारणी आणि मोजणीच्या दोनच प्रकारासंबंधीचे बदल ऑनलाइन यंत्रणेत झाले नाहीत, यामुळे ऑनलाइन मोजणीचे अर्ज दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :शेतीराज्य सरकारसरकारमहसूल विभागशेतकरी