Join us

Jamin Mojani : जमीन मोजणी आता होणार सॅटेलाईटव्दारे! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:02 IST

Jamin Mojani : स्वामीत्व योजनेमुळे मालमत्तेचा पुरावा अर्थात प्रॉपर्टी कार्ड त्याच्या मूळ मालकाला मिळण्याचा मार्ग सोपा झालेला असतानाच आता सॅटेलाइटच्या माध्यमातून जमीन मोजणीची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

स्वामीत्व योजनेमुळे(Swamitva Yojana) मालमत्तेचा पुरावा अर्थात प्रॉपर्टी कार्ड त्याच्या मूळ मालकाला मिळण्याचा मार्ग सोपा झालेला असतानाच आता सॅटेलाइटच्या (Satellite) माध्यमातून जमीन मोजणीची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्याला राज्य शासनाकडून ९१ रोव्हर, १३ प्लॉटर आणि २६ लॅपटॉप मिळाल्याने जमीन मोजणीचा (Jamin Mojani) वेग २५ टक्क्यांनी वाढणार आहे. परिणामी जिगाव प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या १७ हजार हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचाही वेग वाढण्यासोबतच, रस्ते, महामार्ग, नवनगरांसह अन्य विकासकामेही वेगाने होण्यास मत मिळणार आहे.

जिल्ह्यात स्वामीत्व योजना दि. २० एप्रिल २०२० पासून लागू झाली असून, १ हजार ०५६ गावठाणांचे अभिलेख अद्ययावत करण्याच्या दृष्टीने ड्रोन सर्व्हेक्षण करून १ हजार ४६ गावांपैकी ९२७ गावांतील सनद प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यातील सुमारे ६ लाख मालमत्तांपैकी २ लाख ३६ हजार ३०६ मिळकतपत्र तयार झाले आहेत. त्यामुळे जमिनी हस्तांतरणाचा वेग वाढून शासनाच्या तिजोरीत महसुलाची भर पडण्यासोबतच शासकीय मालमत्तांची ओळख, अतिक्रमण काढण्यास मदत मिळणार आहे.

ई-मोजणीमुळे आता विकास कामांचा वेग वाढणार असून संगणकीकरण आणि डिजीटाईझेशन व भूसंदर्भीकरणास मोठी मदत मिळणार आहे.

ई-मोजणीच्या दिशेने पडले पाऊल !

* जिल्ह्यात आता ई-मोजणीच्या दिशेने पाऊल पडले आहे, जमिनीची मोजणी ही यामध्ये सॅटेलाइटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

* त्यासाठी बुलढाणा जिल्ह्याला शासनाकडून २१ रोव्हर मिळाले असून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीमधून ६१ असे १५२ रोव्हर मिळाले आहेत.

* १३ प्लॉटर (प्रिंटिंगमशीन सारखे यंत्र), २६ लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत. परिणामी जिल्ह्यातील शेतजमीन मोजणीचे काम या नव्या तंत्राद्वारे करण्यात येत असून २५ टक्के वेळेची बचत होणार आहे.

जिल्ह्यात दोन ठिकाणी लावले आहे कॉर्स !

जिल्ह्यात देऊळगाव मही आणि खामगाव येथे कॉर्स लावलेले आहे. रोव्हर, उपग्रहामध्ये ते दुवा आहेत.

काय होईल फायदा?

* प्लेन टेबल, ईटीएस मशीनच्या तुलनेत वेळेची २५ टक्के बचत अक्षांश व

* रेखांशासहित नकाशे त्वरित तयार होतील

* भविष्यात पुन्हा नव्याने मोजणी न करता कोऑर्डिनेटद्वारे हद्द निश्चित करण्यास मदत

* भूमापन नकाशे अक्षांश व रेखांशासहित जीआयएस प्रणालीमध्ये अपलोड करता येतील. कॉर्स रोव्हरद्वारे जमिनीची मोजणीची अचूकता वाढेल.

* त्यामुळे वादविवादाचा लगेच निपटारा करणे शक्य होईल.

* गतिमान प्रशासनासह तत्काळ सेवा मिळण्यास मदत मिळेल.

१५२ रोव्हर मिळाले

जिल्ह्यात स्वामित्व योजनेतंर्गत गेल्या चार वर्षापासून काम सुरू होते. ते आता पुर्णत्वास आले आहे. योजनेमुळे रखडलेली जमीन मोजणीही वेगाने होऊन कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jamin Mojani : जमीन मोजणी कशी करतात, साधी मोजणी किती दिवसांत होते? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसरकारी योजनासरकारकेंद्र सरकार