Join us

भारतीय लसणामुळे चीनला ठसका, या देशांमध्ये वाढती मागणी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 17:00 IST

भारतीय लसूण पश्चिम आशियायी देश आणि आफ्रिकेत वेगाने होतोय लोकप्रिय....

जगभरात कुठेही जा, चवीसाठी खाद्यपदार्थांमध्ये लसूण अवश्य वापरला जातो. लसणाच्या जागतिक व्यापारात आजवर चीनचा दबदबा असल्याचे दिसते. परंतु, या बाबतीत आता भारताने चीनचे टेंशन वाढविलेले दिसत आहे. एक काळ असा होता की एकटा चीन जगभरात लागणाऱ्या ८० टक्के लसणाची निर्यात करीत होता. पण, भारताची लसणाची निर्यात वाढू लागल्याने चीनचा निर्यातीतील वाटा ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारात प्राचीन काळापासून भारताचे स्थान अग्रेसर राहिलेले आहे. त्या काळात प्रख्यात असलेला मसाल्याचा रुट भारतातून जात होता. भारतीय लसूण पश्चिम आशियायी देश आणि आफ्रिकेत वेगाने लोकप्रिय होत आहे.

३२.७ लाख टन

इतके सरासरी लसणाचे उत्पादन दरवर्षी भारतात होते. मलेशिया, थायलँड, नेपाळ, व्हिएतनामला याची मोठी निर्यात केली जाते.

२-२.५ कोटी टन

इतके लसणाचे उत्पादन चीनमध्ये दरवर्षी घेतले जाते. चीनच्या लसणाला अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये मागणी असते.

निर्यातीत १६५ टक्क्यांची वाढ

■ स्पाईस बोर्डाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांत भारताच्या लसणाच्या निर्यातीत तब्बल १६५ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.

■ या कालखंडात भारताने ४७,३२९ टन लसणाची निर्यात केली. २०२१-२२ या संपूर्ण वर्षात भारताने ५७,३४६ टन लसणाची निर्यात केली.

■ मागील वर्षाच्या तुलनेत यात १५९ टक्क्यांची वाढ झाली आहे. परंतु, याच कालखंडात चीनच्या लसूण निर्यातीत २५ टक्क्यांची घट झाली.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीचीन