भूषण काळे
सोन्याला झळाळी मिळाल्याने मागील ५० वर्षांत भाव ३०० तर कृषीप्रधान देशातील नागरिकांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याच्या शेतमालाचे भाव केवळ २० पटींनी वाढले आहेत. मागील ५० वर्षांत कृषीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.
१९७४ मध्ये सोन्याचे दर ५० रुपये प्रति ग्रॅम होते. तर कापसाचे भाव प्रतिक्विंटल ३४५ रुपये होते. या ५० वर्षांच्या कालावधीत सोन्याच्या दरात कमालीची तेजी आली आहे. तर कापसाचे दर मात्र सोन्यापेक्षाही कमी आहेत. सध्या ६ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची विक्री होत आहे.
१९७२ मध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा कापसाचे दर ३२० इतके होते. तब्बल १८ वर्षांनी १९९२ मध्ये कापसाचे भाव हजार रुपयांनी वाढले. मध्यंतरीच्या कालावधीत कापसाचे भाव कधी २५ तर कधी ५० रुपयांनी वाढले. त्यानंतर तब्बल १५ वर्षे १९९५ ते २०१० पर्यंत कापसाचे भाव स्थिर होते. २०११ मध्ये कापसाला विक्रमी ३ हजार भाव मिळाला. यानंतर थोड्याफार प्रमाणात कापसाच्या दरात वाढ झाली आहे.
बियाणे, वेचणी, वाहतूक व इतर खर्च, ट्रॅक्टरचा खर्च, खत, कीटकनाशक एकूण २५ हजार खर्च शेतकऱ्यांना येतो. मात्र मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. कापसाप्रमाणेच इतरही पिकांचे तेच हाल आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जगाचा पोशिंदांच उपेक्षित
• हल्ली देशात महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे बाजारातील प्रत्येक वस्तू मागील दोन-तीन वर्षांत दुप्पट-तिप्पट महाग झाली आहे. मात्र, त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसून, उलट भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी शेतात केलेला खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे.
• त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची, कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. जगाचा पोशिंदा म्हणून राबण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वार्थी बनले पाहिजे. केवळ आपल्या गरजेपुरतीच पिके पिकवून बाजाराकडे पाठ फिरविली पाहिजे. मग पाहा शासनाला शेतकऱ्यांची कशी आठवण येत नाही, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
किसान दिन कशासाठी ?
१९७९ ते १९८० या कालावधीत पंतप्रधानपद भूषविलेले देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंती दिनानिमित्त भारतात दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो. आपल्या अल्प कार्यकाळात किसान नेते असलेल्या चरणसिंह यांनी भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक योजनांची सुरुवात केली. मात्र शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे.
जोड व्यवसाय हवा
• घातली पाहिजे. अल्पभूधारक शेतीला जोड व्यवसायाची सांगड शेतकऱ्यांनी गट शेती केली पाहिजे. जे आपल्याला आवश्यक आहे. तेच पीक घेतले पाहिजे.
• धान्य, डाळी, तेलबिया, मिरची असे आवश्यक उत्पादन घेऊन गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी देवाणघेवाण केली पाहिजे, सेंद्रिय शेती पिकवून बिनविषारी अन्नधान्य आपल्या आहारात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांनी गरजा भागवून शासनाच्या दारात जाणे बंद केले तरच सरकारला जाग येईल.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात